- योगेश पायघनछत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०२४ ते २०२९ या पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्यापूर्वी नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रात शासनाकडून वाटप महाविद्यालयांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्याने कुलगुरूंनी आता सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे नागरिकांची मते ऑनलाईन सर्वेक्षणातून जाणून घेतली जात आहेत.
विद्यापीठाचा २०२४-२०२९ या पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यात भविष्यातील गरज, परिसराची गरज जाणून घेण्यासाठी हे बृहत आराखडा सर्वेक्षण करण्यात येत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षण आवश्यक असून, सध्या कार्यरत महाविद्यालय आणि संस्थेत चालू असलेले अभ्यासक्रम, नवीन महाविद्यालय यांबाबत आपल्या भागात कोणत्या अभ्यासक्रमाची, नवीन महाविद्यालयांची आवश्यकता आहे, याबाबत ऑनलाईन प्रश्नावली देऊन लिंकद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात माजी विद्यार्थी, पालक-नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, कुलगुरू, प्र-कुलगुरू, अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी तसेच सर्व संबंधितांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्र-कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाठ यांनी केले आहे.
बृहत आराखडा सर्वेक्षणात http://online.bamu.ac.in/unic/perspective_plan_survey.php या लिंकवर तीन भागांत सर्वेक्षण करण्यात येत आहे. ही सर्व माहिती मराठीतून भरता येणार आहे.
कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांची गरजया सर्वेक्षणातून कौशल्यावर आधारित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम कोणते राबवता येतील, याचा अंदाज येईल. परंपरागत महाविद्यालयांची संख्या गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे नवीन विद्याशाखांकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजसेवक व स्वयंसेवी संस्था यांनी आपली मते नोंदवावीत.-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू