औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या १५ हजारांपेक्षा अधिक आहे. काही शासकीय ग्रामीण रुग्णालये वगळता बहुतांश रुग्णालये कोरोना उपचारासाठी राखीव केली आहेत. विभागीय टर्शरी केअर सेंटर असलेल्या घाटीतील ७५० खाटाही कोरोनासाठी राखीव केल्या गेल्या. त्यात हृदयरोग विभाग, एमआयसीयु हे विभाग सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. प्रमुख खासगी रुग्णालयांतही कोरोनावर भर असल्याने कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात हृदयरोगासंबंधीच्या शासकीय उपचाराची सुविधा केवळ घाटीत आहेत. तेथील ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी गेल्या वर्षाअगोदरपासून बंद पडल्या आहेत. सुपरस्पेशालिटी इमारतीत नवे यंत्र आले. मात्र, तेही कोविडसाठी राखीव झाल्याने हृदयरोग तज्ज्ञांना केवळ ओपीडी सुविधाच घाटीत उपलब्ध होत आहे. ॲन्जिओग्राफी व ॲन्जिओप्लास्टी या सुविधांसाठी खासगी रुग्णालय गाठावे लागत आहे. मोठ्या रुग्णालयात जनआरोग्य योजनांतून सुविधा आहेत. मात्र, कोरोनामुळे लोक अंगावर दुखणे काढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर कोरोना निगेटिव्ह पण एचआरसीटी स्कोर वाढलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी बेडची शोधाशोध करावी लागत आहे. कारण बहुतांश व्हेंटिलेटर हे कोविड उपचारात, तर मोजकेच व्हेंटिलेटर नाॅनकोविड उपचारासाठी उपलब्ध आहेत.
५३ खासगी रुग्णालयांत कोविडचे उपचारशहरात विविध आजारांवर अद्ययावत वैद्यकीय सेवा देणाऱ्या ५३ रुग्णालयांसह ५ शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. शहरात अद्ययावत ४०० खासगी रुग्णालये आहेत, त्यापैकी ५३ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना वगळता इतर रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, कोरोनामुळे इतर रुग्ण विभागातही उपचार घेताना रुग्ण नातेवाईकांत भीती असल्याचे दिसून येते.
जिल्हा रुग्णालयात फक्त कोरोनाचे उपचारजिल्हा रुग्णालयातील नाॅन कोविड सेवा बंद करून तेथे केवळ कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर घाटी रुग्णालयात ११७७ पैकी सुमारे ७५० खाटा कोरोनासाठी राखीव केल्याने केवळ सर्जिकल इमारतीतील १० ते १२ वाॅर्डात नाॅन कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोना निगेटिव्ह पण न्युमोनिया आणि तत्सम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था मेडिसीन विभागाच्या इमारतीसमोरच्या जुन्या वाॅर्ड ८ व ९ मध्ये करण्यात आली आहे.
उपचार वेळेवर देण्यासाठी आग्रहीकोरोनामुळे कर्करोग रुग्णालयाचेही मनुष्यबळ कोरोना रुग्ण उपचारात गुंतलेले आहे. त्यामुळे नियोजित शस्त्रक्रियांची गती काहीशी मंदावली असली तरी शस्त्रक्रिया दररोज सुरू आहेत. किमोथेरपी, किरणोपचार सुरू असून रुग्णांना योग्य ते उपचार वेळेवर देण्यासाठी अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर या आग्रही आहेत. त्यादृष्टीने रुग्णालयाचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर कर्करुग्णांच्या उपचार संख्येत आणखी वाढ होईल.- डाॅ. अजय बोराळकर, ऑन्कोसर्जन तथा वैद्यकीय अधीक्षक, शासकीय कर्करोग रुग्णालय
सुविधा देतच आहोतगेल्या वर्षभरापासून हृदयरोग रुग्णांना सेवा दिली जात आहे. कोरोनामुळे ताण असला तरी रुग्णांकडे दुर्लक्ष होत नाही. मात्र, कोरोनामुळे लोक अंगावर दुखणे काढत असल्याचे दिसून येत आहे. कारण, रुग्णसंख्या घटली आहे. तांत्रिक अडचणींमुळे ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी होत नसली तरी अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधा देतच आहोत.- डाॅ. गणेश सपकाळ, हृदयरोग तज्ज्ञ, सिव्हीटीएस विभाग, घाटी
शहरातील शासकीय रुग्णालये - ५कोविडवर उपचार सुरू असलेली शासकीय रुग्णालये - ५शहरातील एकूण खासगी रुग्णालये - ४००कोविडवर उपचार सुरू असलेली खासगी रुग्णालये -५३