पैठण (औरंगाबाद): पैठण येथील सोनाराच्या पेढीवर तोतया सीबीआय अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या आरोपीसह इतर तीन जणांना पैठण न्यायालयाने दि. ६ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, तोतया सीबीआय अधिकारी बनून आलेला विठ्ठल हारगुडे आठवी नापास असल्याचे समोर आले आहे.विठ्ठल हारगुडेने सीबीआय अधिकारी बनण्याचे केलेले सोंग त्याच्या शिक्षणानेच उघडे पाडले आणि तो सहज पोलीसांच्या तावडीत गावला.
विठ्ठल हारगुडेने, धनंजय गाठे ( पुणे), रघुनाथ ईच्छैय्या, मुत्तू गरूट, विनोद पोटफाडे (पैठण) यांनी संगनमत करून पैठण येथील माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या सोनेचांदीच्या पेढीवर सीबीआय अधिकारी बनून रविवारी छापा टाकला. यावेळी लोळगे यांना तब्बल पाच कोटी रूपयांची मागणी केली होती. परंतु, सुरज लोळगे यांनी प्रसंगावधान राखत पैठण पोलीसांना बोलावून आरोपींचे मनसुबे उधळून लावले होते. या प्रकरणी चारही आरोपींना रविवारी अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाला स्थानिक राजकारणाची किनार असल्याने सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक सतीष भोसले यांनी बंदोबस्तात आरोपीस पैठण न्यायालयात हजर केले. पोलीसांनी आरोपीच्या पीसीआरची मागणी केली न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ओळखपत्र क्राईम ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशनचेआठवी नापास असलेल्या विठ्ठल हारगुडेचा शिक्षणानेच घात केला. सीबीआयचा लोगो वापरून तयार केलेल्या त्याच्या ओळखपत्रावर सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन असे नाव नव्हते तर चक्क क्राईम ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन असे लिहलेले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, निरीक्षक किशोर पवार यांनी ओळपत्रावर नजर फिरवताच तो तोतया असल्याचे ओळखले आणि त्याचे अवतार कार्य संपले. आरोपी विठ्ठल हारगुडेने आणखी कोठे कोठे अशा प्रकारे छापे मारून गुन्हे केले आहेत का या बाबत पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.