औरंगाबाद: पोलिसांची गस्त असेल तर, चोऱ्या घरफोड्यासोबत रस्त्यावर होणारे चाकूहल्ले, लुटमार आणि छेडछाड सारखी गुन्ह्यांना वचक बसतो. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात चार्ली पोलिसांची स्वतंत्र गस्त सुरू केली होती. गतवर्षी चार्ली पथक बंद करण्यात आले आणि शहरातील रस्त्यावरील गस्तच गायब झाल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
एक पोलीस हजार नागरीकांच्या सुरक्षेसाठी पुरेसा असतो, असे म्हटल्या जाते. कर्तव्यदक्ष पोलिसांच्या धाकामुळे गुन्हेगारच त्यांना पाहुन आपला रस्ता बदलतो. पोलिसांची गस्त जोरदार असेल तर रोडरोमिओंकडून महाविद्यालयीन तरूणी, शाळकरी मुलींची होणारी छेडछाडीवर नियंत्रण येते. याशिवाय चोऱ्या,घरफोड्या, लुटमार आणि गल्लीबोळात दादागिरी करणाऱ्यांवरही चांगलाच वचक बसतो. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पोलिसांची प्रभावी गस्त व्हावी,यासाठी त्यांनी गस्तीवरील पोलिसांची सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविली होती. परिणामी गस्तीच्या बाबतीत कामचुकारपणे करणे कोणालाही जमत नव्हते. संजय कुमार यांच्यानंतर राजेंद्र सिंह हे रूजू झाले. त्यांच्या कालावधीत नादुरूस्त झालेली जीपीएस यंत्रणा दुरूस्त करण्यात आली नाही. आणि कामचुकार लोकांचे चांगलेच फावले. त्यानंतर अमितेश कुमार हे रूजू झाले.
अमितेश कुमार यांनी लगेच शहरातील गस्तीसाठी चार्ली पथक स्थापन केले. चार्ली पोलीस दुचाकीने शहरात गस्त करीत होते. यासोबतच त्यांनी वातानुकुलीत पीसीआर मोबाईलमार्फत गस्त सुरू केली. चार्लीचे नियंत्रण पोलीस आयुक्तालयातून होत यामुळे ही गस्त अत्यंत प्रभावी ठरली. अमितेश कुमार यांच्या बदलीनंतर यशस्वी यादव रुजू झाले. यादव यांनी चार्ली बरखास्त करून मोबाईल बेस्ड गस्त सुरू केली होती. गस्त केल्याचे दाखविण्यासाठी कामचुकार पोलीस त्यांचा मोबाईल दुसऱ्याकडे द्यायचे असे किस्सेही आता ऐकायला मिळत आहे. विद्यमान पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बीट मार्शलमार्फत गस्त पुन्हा सुरू केली. बीट हवालदाराला गस्तीसोबत त्याच्या बीटमध्ये घडणाऱ्या गुन्ह्याचा तपास करण्याचे कामही सोपविले जाते. यामुळे तपास करण्यात व्यग्र होणारे पोलीस कर्मचाऱ्यांचे गस्त करू शकत नाही. परिणामी गस्तीवरील पोलीस रस्त्यावर दिसत नाही.