छत्रपती संभाजीनगर : टी.व्ही. सेंटर येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने ई-ऑक्शनद्वारे इच्छुकांकडून दर मागविले. दुकानांसाठी विविध आरक्षणेही ठेवली आहेत. आरक्षणातील एखाद्या दिव्यांग व्यक्तीने २५ लाख किंवा त्यापेक्षा मोठी रक्कम आणायची कोठून? त्यासाठी ई-टेंडर करा, इच्छुकाला जॉइंट व्हेंचर करत व्यवसाय करण्याची संधी द्या, अशी सूचना मनपा प्रशासकांनी केली.
मनपाच्या मालमत्ता विभागाने टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलातील १० गाळ्यांच्या लिलावासाठी ई-ऑक्शन पद्धत अवलंबली होती. या प्रक्रियेवर नागरिकांनी आक्षेप घेतले होते. आता ई-निविदा पद्धतीद्वारे गाळ्यांचा लिलाव होणार आहे. लिलावात दिव्यांग, गरिबांसाठीही आरक्षण आहे. काही दिव्यांग व गरिबांकडे गाळ्यांच्या लीजसाठी लागणारी २५ ते ३० लाखांची रक्कम नसते. ते इच्छा असली तरी एवढे पैसे कुठून आणणार? त्यामुळे आता दिव्यांग व गरिबांसाठी गाळे घेण्यासाठी जाॅइंट व्हेन्चरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा व्यक्ती आपला पार्टनर सोबत घेऊन गाळे घेऊ शकतात, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
आता टपऱ्यांना परवानगी नाहीशहरात जागोजागी रस्त्याच्या कडेला टपरी, हातगाडी लावण्यासाठी पालिकेकडे परवानगी प्रस्ताव दाखल केले जातात. मात्र, आता यापुढे एकालाही अशी परवानगी दिली जाणार नाही. विनापरवानगी टपऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील प्रशासकांनी दिला. पार्किंग पॉलिसी, पथविक्रेता धोरणही लवकरच राबवले जाईल, असे त्यांनी सांगितले.