मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय यावर ही घेणार निर्णय
औरंगाबाद : मुळात १२ वी नापास असलेला परंतु मुक्त विद्यापीठांमधून बी. कॉम. ची पदवी प्राप्त केलेला उमेदवार विधी शाखेच्या (एल.एल. बी.) प्रथमवर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र आहे काय, तसेच मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय, असे भावी वकिलांच्या शैक्षणिक पात्रतेचे निकष ठरविणारे महत्त्वाचे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान आले.
असे विद्यार्थी प्रवेशास पात्र तसेच अपात्र असल्याबाबत उच्च न्यायालयाचे पूर्ण पीठ, खंडपीठ आणि राष्ट्रीय वकील परिषदेचे परस्पर विरोधी निवाडेही सुनावणी दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे प्रवेशाबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी न्या. रवींद्र घुगे आणी न्या. एस. जी. मेहरे यांनी ही याचिका पूर्णपीठाकडे वर्ग करण्याचा आदेश २० ऑगस्टला दिला आहे.
वैजापूर तालुक्यातील लासूर येथील विष्णू रंभाजी हरिश्चंद्रे या विद्यार्थ्याने ॲड. राहुल आर. करपे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार १९९२ साली विष्णू एस. एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने कला शाखेच्या ११ वी मध्ये प्रवेश घेतला होता परंतु तो नापास झाला होता. त्यानंतर मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून, २००८ साली त्याने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी. कॉम. पदवी प्राप्त केली. तो पदवीधर असला तरी १२ वी नापास असल्यामुळे औरंगाबादेतील मा. प. विधी महाविद्यालयाने एल. एल. बी. च्या प्रथम वर्षास प्रवेश नाकारल्यामुळे खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
चौकट
परस्पर विरोधी निवडे
१. कोणताही पदवीधारक विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असल्याचा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने २०१८ साली दिला आहे.
२.मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने मुक्त विद्यापीठाचा पदवीधारक विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असल्याचा निवाडा २०१९ साली दिला होता.
३. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुक्त विद्यापीठाचा पदवीधारकाने क्रमिक (सिक्वेन्शल) १० २ ३ अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्यामुळे तो
विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र नसल्याचा निवाडा २०१८ साली दिला होता.
४. अखिल भारतीय वकील परिषदेच्या प्रवेश नियम ५ नुसार एच. एस. सी. (१२ वी) १० २ उत्तीर्ण असला तरच विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असतो.