- राम शिनगारे छत्रपती संभाजीनगर : ‘रोबोट’ सिनेमात नायिकेस चावलेला नेमका डास यंत्रमानव ‘चिट्टी’ (रजनीकांत) पकडून आणतो. काहीसे तसेच तंत्रज्ञान आता विकसित होत आहे. मच्छरजन्य रोगांपासून जगभरात दरवर्षी ७ लाखांपेक्षा अधिक मृत्यू होतात. मच्छर चावा घेऊन जातो आणि संसर्गजन्य रोग होतो. हे मच्छर नेमके कोणत्या प्रजातीचे आहेत, त्याचा शोध घेणारे मॉड्यूल एका प्राध्यापिकेने विकसित केले आहे. या संशोधनाचे पेटंट प्रकाशित झाले असून, कन्फर्मेशन प्रक्रिया सुरू आहे.
संवेदक सापळा पटवेल ओळख
या मॉड्यूलमध्ये १० वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखल्या जाऊ शकतात. तयार केलेला मच्छर संवेदक सापळा डासांच्या प्रजाती ओळखण्यात सक्षम आहे. कॅमेरा, मायक्रो लेन्सचा, सेन्सरचा वापर करण्यात आला.
असे केले संशाेधन...
देवगिरी महाविद्यालयात संगणक विज्ञान आणि आयटी विभागात सहायक प्राध्यापक असलेल्या डॉ. आयेशा अनम इर्शाद सिद्दीकी यांच्या ‘डेव्हलपमेंट ऑफ मॉस्किटो सेन्सर ट्रॅप’ या विषयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. जाहीर केली. पिवळा ताप, झिका आणि डेंग्यू ही एडिस इजिप्ती डासांद्वारे मानवांमध्ये प्रसारित होणाऱ्या अर्बोव्हायरसची काही उदाहरणे आहेत.मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात विकृती गर्भधारणेदरम्यान झिका विषाणू संसर्गामुळे होतात. मानवी डोळ्याद्वारे डासांच्या प्रजातींमध्ये फरक करणे, हे आव्हानात्मक काम आहे. डासांच्या प्रजाती ओळखण्यासाठी सूक्ष्मदर्शक आणि कीटकशास्त्रज्ञ आवश्यक आहेत, असे मॉड्यूल डॉ. सिद्दीकी यांनी बनवले.
या मॉड्यूलचा उपयोग कीटकशास्त्रज्ञ, आरोग्यसेवा कर्मचारी, व्हेक्टर कंट्रोल एजन्सीच्या मदतीसाठी होणार आहे. या अभिनव अशा संशोधनाला पेटंट मिळण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यानुसार हे संशोधन पेटंट कार्यालयाने प्रकाशित केले असून, कन्फर्मेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. - डॉ. आयेशा सिद्दीकी, संशोधक