औरंगाबाद : पैठण रोड येथील नाथ सीड्सच्या वळणावर मंगळवारी (दि. २७) सकाळी एक कंटेनर रस्त्याच्या बाजूला उलटला. त्याखाली एक दुचाकीस्वार दबला. तो तासभर मदतीसाठी हाक देत होता. परिसरातील नागरिकांसह सातारा पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, अधिकाऱ्यांनी मदत देत त्याला सुखरूप बाहेर काढले.
आदिनाथ पांडुरंग वाघ (२४, रा. म्हाडा कॉलनी, नक्षत्रवाडी ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सलूनचे दुकान उघडण्यासाठी सकाळीच तो दुचाकीवरून (एमएच २० सीक्यू ३३८९) निघाला होता. तो कंटेनरला ‘ओव्हरटेक’ करीत होता. त्याचवेळी कंटेनर (एमएच २० जीसी ५५५७) उलटला. तो कंटेनरखाली बदला गेला. तेव्हा त्याने मदतीसाठी ‘वाचवा वाचवा,’ अशा हाका मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी कंटेनरचा चालक पळून गेला. आदिनाथ मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होता. रस्त्याने जाणारी वाहने निघून जात होती.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातच राहणारे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह इतरांनी धाव घेतली. त्याचवेळी काहींनी पोलिसांच्या ११२ क्रमांकावर अपघाताची माहिती दिली. अग्निशामक दलालाही पाचारण केले. सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे हे पथकासह पोहचले. सर्वांनी मिळून कंटेनर मधील साहित्य बाहेर काढले व क्रेनच्या सहाय्याने कंटेनर उचलण्यात आले. त्यानंतर खाली अडकलेल्या आदिनाथला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे माजी महापौर घोडेले यांच्या गाडीतून त्यास घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्यासह अग्निशामक विभागाचे अधिकारी आर. के. सुरे, एम. एल. मुंगसे, एल. पी. कोल्हे, सुजित कल्याणकर, मयूर कुमावत, नदीम शेख, विक्रम भुईगळ, किरण पागोरे आणि मोहित त्रिवेदी, प्रेम साबळे आदींनी तरुणाला कंटेनर खालून बाहेर काढण्यासाठी मदत केली.