औरंगाबाद: तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या भूखंडाची सातबाऱ्याला नोंद करण्यासाठी ५ हजार रुपये लाच घेताच तलाठ्याला बुधवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मिटमिटा येथे करण्यात आली. उदय सुधाकर कुलकर्णी (५०, रा. मृणाल संकुल, शिवकृपा कॉलनी, बीड बायपास) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे नुकताच साईनगर येथे एक भूखंड खरेदी केला आहे. या भूखंडाची सातबाऱ्यावर नोंद घ्यावी आणि सातबारा द्यावा यासाठी त्यांनी मिटमिटा सज्जाचे तलाठी उदय कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यांनी तलाठी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही नोंदणी करण्यासाठी ५ हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याविषयी तक्रार नोंदविली.
यानंतर अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा आरोपीने बुधवारी सकाळी लाचेची रक्कम घेऊन येण्यास तक्रारदार यांना सांगितले. पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक उन्मेश थिटे, पोलिस नाईक राठोड, देशमुख, जोशी आणि चालक चंद्रकांत शिंदे यांनी मिटमिटा येथील तलाठी सज्जाजवळ सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून लाच घेताच कुलकर्णी याला रंगेहाथ पकडले. याविषयी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.