औरंगाबाद : सिडको बसस्थानकातून बस निघाली म्हणून भावाला फोन केला; पण काही मिनिटातच धडाड असा आवाज झाला आणि डोके समोरच्या सिटवर आदळले. काही वेळासाठी शुद्ध हरपली. शुद्धीवर आले तर समोरचे दृश्य पाहिले जात नव्हते. कोणाच्या नाकातून रक्त येत होते, तर कोणाच्या डोक्यातून. सोबत ३ लेकर होती, सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही, हे सांगताना शीला गांगवे यांचा थरकाप उडत होता.
औरंगाबाद-जालना बसमधून त्या मंगळवारी जालन्याला जात होत्या. या अपघातात त्यांच्या डोळ्याखाली जोरदार मार लागला. त्यांच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. अपघातानंतर बसमधील बहुतांश जणांच्या चेहऱ्याला मार लागला होता. त्यामुळे रक्त येत होते. अपघातामुळे दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे कोणी काचा फोडलेल्या खिडकीतून उतरले. तर कोणी चालकाच्या दरवाज्यातून उतरले, असे शीला गांगवे म्हणाल्या.
बहीण जखमी झाल्याची माहिती मिळताच भावाची धाव
बसचा अपघात झाल्याने बहीण शीला गांगवे या जखमी झाल्याची माहिती भाऊ सुभाष चव्हाण यांना मिळाली. त्यावेळी ते आकाशवाणी चौकात होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. समोरचे दृश्य पाहिलेही जात नव्हते. उपचारासाठी घाटीत आणले; परंतु येथे मदतीसाठी कोणी आले नाही, असे सुभाष चव्हाण म्हणाले.
आजी-आजोबांसोबत जाणारे नातवंडे जखमी
आजी आजोंबासोबत बसमधून डोणगाव (जि. जालना) येथे शेख हमजा शेख शफीक (१३) आणि शेख मुस्तफा शेख शफीक (११, रा.सादातनगर) हे दोघे जात होते. या अपघातात शेख हमजा यांच्या चेहऱ्यावर, तर शेख मुस्तफा यांच्या चेहऱ्यावर आणि हाताला मार लागला. दोघांवर घाटीत उपचार करण्यात आले. त्यांचे आजोबा सय्यद निसारुद्दीन (७०) आणि सय्यद तस्लीम बेगम (६५) यांना मात्र, फार लागले नाही, असे शेख शफीक यांनी सांगितले.