औरंगाबाद : विद्यापीठ गेट ते मिलिंद कॉलेज, निरालाबाजार ते विवेकानंद महाविद्यालय परिसरात बोलत असताना एकटे पाहून मोबाईल हिसकावणारे दोन चोरटे गुन्हे शाखेच्या कारवाईत पकडण्यात आले आहेत. या चोरट्यांकडून सहा मोबाईलसह चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या चोरट्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या दोन चोरट्यांकडून ६३ हजार रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांनी मिळविले. या कारवाईत एकूण १ लाख ९८ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक एका दुचाकीची माहिती घेत असताना मोबाईल हिसकावणारा चोरटा वाळूज येथे आरजू मॉडर्न शॉप नावाचे दुकान चालवितो. त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता अर्जुन राजेश दणके, अजय किशोर जाधव (दोघे, रा. वाळूज) सापडले. त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी दुचाकीवरून (एम.एच. १२, पी.एम. १३४०) सहा मोबाईलची चोरी केली असल्याची कबुली दिली. हे मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत.
या चोरट्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर एमआयडीसी भागात स्वप्निल केदारे व एक अल्पवयीन (दोघे, रा. वाळूज) आरोपी स्पोर्ट बाईकचा वापर करून मोबाईल हिसकावून चोरी करीत होते. त्यांच्याकडून ६३ हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले आहेत. यात क्रांती चौक, छावणी व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त मीना मकवाना, साहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, अंमलदार किरण गावडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, नितीन धुळे, चालक अजहर कुरेशी, आदींनी केली आहे.