लाडसावंगी : परिसरात आंबा पिकाला एकीकडे कैऱ्या लगडल्या असताना दुसरीकडे त्याच आंब्याच्या झाडाला पुन्हा बहर फुटल्याने एकाच वर्षात दोनदा बहर पाहायला मिळाल्याने शेतकरी आचंबित झाले आहेत.
आंबा पिकाला एकदा बहर आला तर त्याला काही महिन्यांत कैऱ्या लगडतात. मात्र लाडसावंगी परिसरात आंब्याच्या झाडाला यंदा जानेवारी महिन्यात व मार्च महिन्यात एकाच झाडाला दोन वेळा बहर आला आहे. एकीकडे जानेवारी महिन्यात फुटलेल्या बहराच्या कैऱ्यांची वाढ होत असतानाच त्याच झाडाला पुन्हा बहर फुटला आहे. एकीकडे पुढील महिन्यात पिकलेला आंबा बाजारात विक्री होईल, तर दुसरीकडे त्याच झाडाला लहान कैऱ्यासुद्धा लगडलेल्या दिसतील. यामुळे हा लहरी निसर्गाचा चमत्कारच असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांना पिके सोंगण्याची घाई
एकीकडे जूनपासून सतत व प्रत्येक महिन्यात पावसाळ्यासारखे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या सोमवारपासून आकाशात ढग जमा होत असल्यामुळे पुन्हा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर पाऊस पडला तर रब्बीचे गहू, हरभरा, सूर्यफुल, मका पिकांची नासाडी होईल या भीतीने शेतकरी पिके सोंगण्यासाठी घाई करीत आहेत.
फोटो : लाडसावंगी परिसरात आंब्याच्या पिकाला एकीकडे कैऱ्या लगडल्या असताना त्याच फांदीवर असा नवीन बहर आला आहे.