यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशीला मार बसला. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काही शेतकऱ्यांचा कपाशीच्या पिकावर झालेला खर्चही निघाला नाही. आता ६,२०० रुपये क्विंटलप्रमाणे सुपर कापसाला दर मिळत आहे. त्यामुळे गावोगावी जाऊन व्यापारी कापूस शोधताना दिसत आहेत.
सुरुवातीला कपाशीचा दर पाच हजार रुपये असताना शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला, तर शासनाने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करून पाच हजार आठशे रुपयांपर्यंत कापूस खरेदी केला. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्राचा फायदा झाला. मात्र, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. शेतकऱ्यांनी शासनाच्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण खासगी व्यापाऱ्यांकडून सहा हजारांच्यावर कापसाला भाव दिला जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडील कापूस संपत आला, तशी कापसाच्या दरात वाढ होत गेली. या कापूस दरवाढीचा शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला, तर दरवाढीचा खासगी व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
------
मागील वर्षी कोरोनाच्या रोगाच्या संसर्ग वाढू नये. यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनच्या काळातही शासनाने शेतकऱ्यांच्या घरात असलेला कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदीचा लाभ मिळवून दिला. शेतकऱ्याचा कापूस संपेपर्यंत कापूस खरेदी सुरू ठेवली होती. यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच सुरू केली होती. - राजू म्हस्के, जिनिंग प्रेसिंग संचालक, वडोद बाजार.