’औरंगाबाद : गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल रोडवर तीन महिन्यांपूर्वी व्हाईट टॅपिंगचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र, त्या रस्त्याच्या मध्ये बसविण्यात आलेले गट्टू उखडल्याने कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. महानगरपालिकेच्या वतीने सेव्हन हिल ते सूतगिरणी रोडपर्यंतचे व्हाईट टॅपिंगचे काम सुरू आहे. यात सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून बाकी आहे. सर्वात अगोदर गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिल या बाजूच्या रस्त्याचे व्हाईट टॅपिंग करण्यात आले. कडा आॅफिसच्या बाजूला पाण्याच्या टाकीसमोरील बाजूस गट्टू बसविण्यात आले आहेत. मात्र, जे गट्टू बसविले ते निकृष्ट दर्जाचे असल्याने तीन महिन्यांतच ते उखडून तेथे लहान-मोठे खड्डे पडले आहेत. येथे ३४ लहान-मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांत वाहने आदळून वाहनचालकांना झटका बसत आहे. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दररोज येथे किरकोळ अपघात घडत आहेत. खड्ड्यात आदळून अनेक वाहनांचे टायर पंक्चर होत आहे. निकृष्ट दर्जाचे गट्टू बसविल्याने पितळ घडले पडल्यानंतर कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला नवीन गट्टू आणून ठेवले आहेत. कहर म्हणजे नवीन गट्टूसुद्धा पहिल्या गट्टूसारखेच दिसत आहेत. यामुळे कंत्राटदाराने जुने गट्टू काढून नवीन बसविले; तरीही त्याच्या दर्जाविषयी नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.
उद्घाटनाआधीच लागली व्हाईट टॅपिंगची ‘वाट
By admin | Published: May 10, 2016 12:41 AM