औरंगाबाद: आम्हाला रोखणारे तुम्ही कोण, असे म्हणत संचारबंदीचे उल्लंघन करून फिरणार्या तीन तरूणांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना ५ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११.५० वाजेच्या सुमारास सिडकोतील वसंतराव नाईक चौकाजवळील हॉटेल लेमन ट्रीसमोर नाकाबंदी पॉईंटवर घडली. या घटनेप्रकरणी सिडको पोलिसांनी आरोपी तरूणांना अटक केली.
प्रताप पोपटराव जगताप(२४,रा. न्यू एस.टी. कॉलनी, एन २ सिडको), आकाश सुनील कुलकर्णी(२३,रा. जयभवानीगनर) आणि आशुतोष नवनाथ झिंजुर्डे(२३,रा. जयभवानीनगर) अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याघटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार गणेश आबाराव लोखंडे हे पोलीस काँन्स्टेबल असून ते दंगा काबू पथकात कार्यरत आहेत. गुरूवारी रात्री ते आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी भिसे,कडू, घोडके आणि पाराशर हे नाकाबंदी करीत होते. रात्री ११्.५० वाजेच्या सुमारास कॅनॉटकडून मुकुंदवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला त्यांनी थांबण्यास सांगितले. तेव्हा तो काही अंतरावर जाऊन थांबला. लोखंडे हे त्याच्याजवळ जाऊन रात्री कशासाठी फिरत आहात असे त्यांनी त्याला विचारले असता दुचाकीस्वार तरूणाने त्यांना शिवीगाळ करीत तुम्ही मनपाचे कर्मचारी आहे, तुला मला थांबविण्याचा काय अधिकार आहे ? असे म्हणून लोखंडे यांच्या शर्टच्या कॉलर पकडून त्यांना जोराचा धक्का मारला. यानंतर त्याने लोखंडे यांच्या गालावर जोरात बुक्का मारला.
हा प्रकार पाहून लोखंडे यांचे सहकारी तेथे आले आणि मारहाण करणाऱ्या तरूणाला ते समजावून सांगू लागले. त्याचवेळी त्या तरूणाचे अन्य दोन साथीदार दुचाकीवरून तेथे आले. तुम्ही आमच्या मित्राला का थांबवले, असे म्हणून ते पो.कॉ. लोखंडे यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करीत पकडून खाली पाडले. तिघांपैकी एकाने रस्त्यावरील दगड उचलून लोखंडे यांच्या खांद्यावर मारला तर अन्य दोघांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार आणि कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांनी तात्काळ आरोपींना अटक केली.