वाळूज महानगर (औरंगाबाद) : मध्यरात्री लाउड स्पीकर वाजविण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका गुंडाने पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना गुरुवारी रात्री वाळूजला घडली. आरोपी प्रशांत ऊर्फ सोन्या चौरे (रा. हनुमंतगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूजच्या झेंडा मैदानावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास काहीजण लाउड स्पीकरवर कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवित असल्याची तक्रार दक्ष नागरिकांनी वाळूज पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर पोलीस कॉन्स्टेबल विजय त्रिभुवन व खरात हे दोघे १२ वाजेच्या सुमारास घटनास्थळी गेले. या ठिकाणी गुंड प्रशांत ऊर्फ सोन्या चौरे हा लाउड स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवत होता. कॉन्स्टेबल विजय त्रिभुवन यांनी त्यास शेजाऱ्यांना त्रास होत असून, स्पीकर बंद करण्यास सांगितले. संतप्त झालेल्या प्रशांत ऊर्फ सोन्या याने त्रिभुवन यांना ‘तू कोण आहे, मी तुला ओळखत नाही, तू येथून चालता हो, मला आणखी दोन गाणी वाजवायची आहेत,’ असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली.
श्रीमुखात लगावलीया वादानंतर पोलीस कॉन्स्टेबल त्रिभुवन हे प्रशांत ऊर्फ सोन्या यास समजावून सांगत असताना त्याने त्रिभुवन यांच्या अंगावर धावून जात त्यांची कॉलर पकडत श्रीमुखात लगावली. आरोपीने खरात यांना शिवीगाळ करीत मी तुला पाहून घेईन. मला पोलिसाची भीती वाटत नाही, माझ्यावर खूप गुन्हे दाखल आहेत अशा धमक्याही दिल्या. आरोपी प्रशांत हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी त्यास वर्षभरासाठी हद्दपार केले होते. पोलीस कॉन्स्टेबल विजय त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत ऊर्फ सोन्या चौरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार सखाराम दिलवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी प्रशांत ऊर्फ सोन्या यास रात्री अटक केली.