औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मे महिन्यात होणार आहे. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपने प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना पदवीधर नोंदणी प्रमुख केलेले आहे. तेव्हापासून बोराळकर यांचेच एकमेव नाव आघाडीवर होते. मात्र, सहनोंदणीप्रमुख असलेले राज्य बालहक्क मंडळाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांच्या नोंदणी कार्यालयाला चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आले आहे.
पदवीधरच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेले शिरीष बोराळकर यांनी शहरातील सुज्ञ व्यक्तींची बैठक बोलावली होती. या बैठकीत अल्प कालावधीत मोठ्या संख्येने जमलेल्या सुज्ञ मतदारांमुळे चंद्रकांत पाटील भारावूनही गेले होते. भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी रात्री उशिरा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रवीण घुगे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत घुगे यांनी पाटील यांच्याकडे आपण केलेल्या कार्याचा अहवालही सादर करीत उमेदवारी देण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच मोटारसायकलवर काढलेल्या संपर्क अभियानाचीही माहिती दिली. दुसऱ्या दिवशी पाटलांच्या शिर्डी दौऱ्यातही घुगे सोबतच होते. त्यामुळे घुगे यांच्या गोटातून उमेदवारी मिळणार असल्याचा ठाम दावा करण्यात येत आहे.
दुसरीकडे शिरीष बोराळकर यांनी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात दौरा काढला आहे. त्यांनाही उमेदवारी मिळणार असल्याचा ठाम विश्वास आहे. या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी शिरीष बोराळकर व प्रवीण घुगे यांना विचारले असता, त्यांनी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यास निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचे सांगितले. पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवाराचे नाव जाहिर झाल्यानंतर भाजप येथील नाव घोषित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण?कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची राज्यात सत्ता असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आ. सतीश चव्हाण हेच उमेदवार असणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, याची घोषणा केव्हा होते, याकडे भाजपसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.