औरंगाबाद : मराठवाड्यातील खासदार, आमदार केंद्र शासनाच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला घरी बोलावून आधी आमचे ‘काम’ कर असा आग्रह धरतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केल्यानंतर मराठवाड्यासह सर्व लोकप्रतिनिधींमध्ये अपमानाची भावना निर्माण झाली आहे. विभागात जे कुणी लोकप्रतिनिधी कंत्राटदारांना घरी बोलावतात, त्यांची नावे गडकरींनी जाहीर करावीत, उगाच गव्हाबरोबर किडे रगडू नयेत, अशी पुष्टीही अनेकांनी जोडली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील लोकप्रतिनिधींनी वेगवेगळी मते गडकरी यांच्या वक्तव्यावर व्यक्त केली असून, ज्यांनी कंत्राटदारांना घरी बोलावून काही मागण्या केल्या असतील त्यांची नावे जर गडकरींनी समोर आणली तर सत्य जनतेसमोर येईल.
'मराठवाड्यात लोकप्रतिनिधी कंत्राटदाराला ‘घरी’ बोलवतात त्या त्रासामुळे काम सोडून पळतात'
केंद्र शासनाच्या निधीतून एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला तर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी मराठवाड्यातील खासदार, आमदार त्याला घरी बोलावतात. अगोदर आमचे ‘काम’ कर, मगच पुढे विकासकामाला सुरुवात कर, असा अजब आग्रह धरतात. त्यामुळे मराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार अक्षरश: कामे सोडून पळून जात आहेत. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले होते. मराठवाड्यात कंत्राटदाराला त्रास देण्याची पद्धत अतिशय वाईट आहे. जे लोकप्रतिनिधी त्रास देतात त्यांना पकडा असेही सीबीआय संचालकांना सांगितल्याचे गडकरी म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.
नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात?
लोकप्रतिनिधींची मते अशी-- सतीश चव्हाण, पदवीधर आमदार, राष्ट्रवादीमराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण म्हणाले, हा तर लोकप्रतिनिधींचा अपमानच आहे. जे कंत्राटदारांना घरी बोलावतात त्यांची नावे जाहीर करावीत. त्यांच्याबरोबर सर्वांना गृहीत धरू नये. गडकरी खरे बोलतात, त्यामुळे त्यांचे कौतुक वाटते. मात्र त्यांनी नावे समोर आणली तरी आनंद होईल. मग ते लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असोत.
- अंबादास दानवे, विधानपरिषद आमदार, शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.अंबादास दानवे म्हणाले, ज्यांनी हा सगळा प्रताप चालविला आहे, त्यांना उघडे करावे. गव्हाबरोबर किडे कशाला रगडता. आधी गडकरींनी मराठवाड्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. आम्हाला बाकीचे ज्ञान त्यांनी पाजळू नये. मराठवाड्याची उपेक्षा त्यांनी थांबवावी.
- अतुल सावे, आमदार, भाजप भाजपचे आ.अतुल सावे म्हणाले, ज्यांनी अशी उठाठेव केली आहे, त्यांना त्या वक्तव्यामुळे त्रास झाला असेल. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या वक्तव्यामुळे कुठलाही त्रास नाही. कारण आम्ही काही कंत्राटदार, अभियंत्यांना घरी बोलावून आमचे कोणतेही काम सांगत नाहीत.