औरंगाबाद : नवाबपुरा रोडवरील भारतीया हॉस्पिटल परिसरातील कप्तान, गुडलक दुकानांच्या समोर लावलेल्या तीन चारचाकी गाड्या, तीनचाकी हत्ती, चार दुचाकी आणि ‘अपना’ हे इलेक्ट्रिक दुकान दंगेखोरांनी पेटवून दिले. या गाड्यांची अगोदर तोडफोड, रॉकेलची कॅन आणून गाड्या, दुकान पेटविण्यात आल्याचा साडेनऊ मिनिटांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या जाळपोळीचे नेतृत्व करणारा नेता पोलीस अधिकाऱ्याशी ‘हात’ मिळवतो अन् पोलीस जिन्सीकडे निघून जातात. यानंतर मागे जाळपोळ केली जाते. हस्तांदोलन करणारा अधिकारी आणि नेता कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
शहरात उसळलेल्या दंगलीचे मुख्य केंद्र नवाबपुरा, राजाबाजार चौकात होते. या भागात दोन्हीकडील हजारो युवक जमा झाले होते. पोलिसांनी नवाबपुरा रोडवर असणारा जमाव अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत, गोळीबार करीत पाठीमागे रेटला. नवाबपुरा रोडवरून जिन्सीकडे जाणा-या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पोलीस जात होते. हातात शस्त्रास्त्र, अश्रुधुरांच्या नळाकांड्यांचे बॉक्स होते. याचवेळी एक युवक पोलिसांसोबतच चालत होता. तेव्हाच नेहरू पायजमा घातलेला युवानेता एका पोलीस अधिका-याशी ‘हात’ मिळवतो. नंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी जिन्सीकडे जातात. नेता राजाबाजारकडे मागे फिरतो. दोन मिनिटांतच चार युवक हातात लोखंडी रॉड घेऊन येतात. ही फोडा..ती फोडा अशी आरडाओरड होते. कप्तान, गुडलक दुकानासमोरील गाड्यांची तोडफोड सुरू होते.
पोलीस नवाबपुरा रोडवरून पुढे गेलेले असतात. मागे हा नंगानाच सुरू होतो. गाड्यांची तोडफोड केल्यानंतर तीन चाकी हत्ती येतो. तेव्हा तो नेता तोंडावर रुमाल झाकून घेतो. त्या तीनचाकी गाडीत असलेल्या कॅनमधून रॉकेल काढण्यात येते. हे रॉकेल तोडफोड केलेल्या चारचाकी गाड्यांच्या सीटवर टाकले जाते, तेवढ्यात एक युवक टेंभा पेटवतो अन् सर्व गाड्यांना आग लावतो. पुढच्या दोन मिनिटांतच गाड्या पेट घेतात. गाड्यांचे अलार्म मोठ्याने वाजले जातात. याचवेळी दंगेखोर दुचाकी गाड्या जाळतात. नंतर आपला मोर्चा दुकानाकडे वळवतात. अवघ्या तीन मिनिटांतच गाड्यांना आगीने पूर्ण वेढले जाते, असे या व्हिडिओतून समोर आले आहे.
येथूनच झाली जाळपोळीला सुरूवात?गांधीनगर, मोतीकारंजा परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजता सुरूवात झालेली दंगल राजाबाजार, नवाबपुरा, शहागंज भागात मध्यरात्री एक वाजेनंतर भडकली. या दंगलीत सुरुवातीला दगडफेक, दुकानांची तोडफोड सुरू होती. मात्र कप्तान, गुडलक या दुकानांच्या समोरील जाळलेल्या गाड्यांपासूनच जाळपोळीला सुरूवात झाली असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओतील जाळपोळ करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर यातील खरे चित्र पोलीस चौकशीत स्पष्ट होईल, असेही बोलले जाते.
दंगेखोरांना पोलिस संरक्षण?या व्हिडिओत पोलीस संरक्षणातच दंगेखोर येतात. पोलीस पुढे निघून गेल्यानंतर मागे निर्मनुष्य रस्त्यावरील गाड्या, दुकाने पेटवून देतात. हे धक्कादायक आहे. संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनीच दंगलखोरांना अभय दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.
रक्षकच भक्षक बनल्यास आम्ही काय करणार?पोलिसांच्या संरक्षणात कप्तान, गुडलक दुकानांसमोरील गाड्यांची जाळपोळ करणारा धक्कादायक व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करीत असताना एकदा फोनही येतो. एक छोटा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत बोलत असल्याचेही ऐकू येते. व्हिडिओ बनविणाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, दंगेखोर पोलीस संरक्षणातच जाळपोळ करीत असतील, तर आम्ही काय करावे? कोणाकडे जावे? डोळ्यादेखत आमची गाडी पेटविण्यात आली; मात्र आम्ही काहीही करू शकलो नाही, गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा होता, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.