छत्रपती संभाजीनगर : भाजप आणि शिवसेना शिंदे गटात औरंगाबादलोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही जागा महायुतीच्या वाटाघाटीत भाजपलाच सुटावी, यासाठी भाजप पदाधिकारी, नेत्यांनी ६ मार्चपासून आजवर आठवेळा मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या केल्या. उमेदवारीचे चित्र अजूनही अस्पष्टच असल्यामुळे इच्छुकांसह पक्षाचे नेते, पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेनंतर भाजप ही जागा पहिल्यांदाच लढणार असे चित्र स्पष्ट झालेले असताना शिवसेना शिंदे गटाने दहा दिवसांपासून ही जागा शिंदे गट लढणार असा दावा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपतील इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. जागेच्या वाटाघाटीत काय होणार यावर पक्षातील पदाधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत, तर शिंदे गटाकडून रोज जागा आमचीच असा दावा करण्यात येत आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या भेटी घेऊन पक्षाने मागील वर्षभरापासून केलेले काम, सामाजिक समीकरणासह इतर बाजू मांडल्या आहेत. शिंदे गटाला जागा सुटल्यास भाजपच्या संघटन बांधणीवर मोठा परिणाम होईल. शिंदे गटाने मतदारसंघ बांधणीसाठी प्रयत्न केलेले नाहीत. भाजपच्या नेटवर्कवरच त्यांची भिस्त आहे, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. जागा न सुटल्यास नाराज झालेली भाजपची फळी शिंदे गटाचे किती ताकदीने काम करील याबाबत पदाधिकारी खासगीत बोलताना शंका व्यक्त करीत आहेत. औरंगाबादलोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. भाजपचे दोन आमदार आहेत. शिंदे गटाचा एकही मंत्री मतदारसंघात नाही, तर भाजपकडे एक केंद्रीय राज्यमंत्री आणि एक राज्यात असे दोन मंत्री आहेत. भाजप किमान वर्षभरापासून मतदारसंघात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे, तर शिंदे गटाकडूनही असाच दावा करण्यात येत आहे.
भाजपकडून प्रतिक्रिया नाहीजागा मागणीवरून शिंदे गटाच्या आक्रमकतेपुढे भाजपकडून कुणीही प्रतिक्रिया देत नाही. भाजप एवढी शांत का आहे, त्यांच्या शांततेत नेमके काय दडले आहे, हे कळण्यास मार्ग नाही. एकतर जागा सुटणार असा त्याचा अर्थ आहे किंवा जागा शिंदे गटाला जाणार असा दुसरा अर्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
चर्चेचे गुऱ्हाळ लांबणारलोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी अधिसूचना गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी निघणार आहे. आजपासून एक महिन्याने अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे या जागेचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबतो की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या आठवड्यात तिढा सुटला तर सुटेल, वाटाघाटीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ एप्रिल उजाडेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.