औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शहरात ८ जून रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना शहरासाठी पोकळ घोषणा न करता कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी करत एक पत्र लिहिले आहे. यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, 'कोण आहे तो, शहरासाठी काय योगदान असा सवाल केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या सभेनंतर शहरात मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील शिवसेना शाखेच्या वर्धापन दिनाच्यानिमित्ताने होत असलेल्या या सभेमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षाने शिवसेनाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. भाजपने शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेत महापालिकेतील शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले. तर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिशाहीन घोषणा करू नये, कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी एका पत्राद्वारे केली. पत्रात त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, शहरातील सभेच्या तयारीवर जातीने लक्ष ठेवून असणारे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या मागणी पत्रावरून खादर जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ''कोण आहे तो, शहर विकासात काय योगदान. शहरातील मुस्लीम नागरिक सुद्धा त्याच्यावर नाराज आहेत. मुस्लीम नागरिक स्वतः माझ्याकडे आले. आम्ही देखील सभेला येणार असे सांगितले. नागरिकांची कामे करावी लागतात. सेवा करावी लागते, हे कुठे करतो तो.'' असा सवाल खैरे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच सर्व कामे केली आहेत. कोणाच्या मागणीने झाले असे नाही.
संघ परिवाराने मध्यस्थी करावीभाजपकडून खालच्या पातळीवर होत असलेल्या टीकेवर संघ परिवाराने मध्यस्थी करावी. ठाकरे कुटुंबावर होणारी टीका शिवसैनिक सहन करू शकत नाही. किरीट सोमय्या लवकरच जेलमध्ये दिसतील असा दावाही खैरे यांनी यावेळी केला.