छत्रपती संभाजीनगर : शासकीय वसतिगृहात रविवारी दुपारी अभ्यास करत बसलेल्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर छताच्या प्लास्टरचे मोठमोठे तुकडे कोसळले. या घटनेत तो जखमी झाला असून यानिमित्ताने वसतिगृहाच्या मेंटेनन्सचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मेंटेनन्सबाबत सातत्याने सांगितल्यानंतरही बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नाही, असा आरोप समाज कल्याण विभागाने केला आहे.
केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे नामविस्तार वर्धापन दिन महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी शहरात असतानाच ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आले आहे. किलेअर्क परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांच्या वसतिगृह ईमारतीत पाच युनिट असून दोन नंबरच्या युनिटमध्ये ''बी- २१'' या खोलीत ही घटना घडली. यात अनुपम झडे हा विद्यार्थी जखमी झाला आहे. तो ''एमएसडब्ल्यू''चे शिक्षण घेत असून त्याच्या गुडघ्याला मार लागला आहे. विशेष म्हणजे, तो वनविभागाची परीक्षा उत्तीर्ण झाला असून या १५ दिवसांत त्याची मैदानी चाचणी आहे. या चाचणीला आता सामोरे जाता येईल का, अशी चिंता त्याला सतावत आहे.
या घटनेनंतर समाज कल्याण विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त सुनिता थिटे वसतिगृहात गेल्या. त्यावेळी मेंटेनन्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरूद्ध विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. वसतिगृहात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. वसतिगृहात पूरेसे पाणी नाही. फिल्टर नादुरुस्त आहे. दरवाजे, खिडक्या, कडीकोंडे तुटलेले आहेत, या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
त्रुटीत अडकला अडीच कोटींचा प्रस्तावकिलेअर्क परिस्थितील शासकीय वसतिगृहाचे पाचही युनीट सन २०११ पासून वापरात आहेत. त्यांच्या मेंटेनन्ससाठी बांधकाम विभागाला कळविण्यात आल्यानंतर संबंधित अभियंत्यांनी इमारतींची तपासणी केली. त्यासाठी त्यांनी दिलेला अडीच कोटींचा प्रस्ताव समाज कल्याण आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आला. काही त्रुटींमुळे तो परत आला असून त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तो पुन्हा बांधकाम विभागाकडे पाठविला. पण, दोन महिन्यांपासून त्यावर कार्यवाही झालेली नाही. कालच्या घटनेसंदर्भात पुन्हा बांधकाम विभागाला अवगत करण्यात आले आहे.- सुनिता थिटे, सहायक आयुक्त, समाज कल्याण.