औरंगाबाद : घाटीच्या अधिष्ठातापदी डाॅ. संजीव ठाकूर यांची झालेली बदली अखेर रद्द झाली आहे. महिनाभरापूर्वी त्यांची सोलापूर येथून औरंगाबादेत बदली झाली होती. मात्र ते रुजू झालेच नाहीत. आता घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
नेमके कोण नवे अधिष्ठाता विराजमान होणार, याकडे घाटीतील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. ८ एप्रिल रोजी डाॅ. ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते सोलापूर येथील डाॅ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते; परंतु बदलीच्या महिनाभरानंतरही ते रुजू झाले नाहीत. महिनाभरात आता डाॅ. ठाकूर यांना पुन्हा सोलापूरलाच पदस्थापना देण्यात आली आहे.
घाटीतील उपअधिष्ठाता व शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे हे नंदूरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी कार्यरत आहेत. घाटीचे वैद्यकीय उपअधीक्षक व अधीक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्याची चुणूक या काळात प्रकर्षाने दिसून आली. घाटीचा कारभार सुधारण्यासाठी घाटीच्या अधिष्ठातापदाचा कारभार डाॅ. सुक्रे यांच्याकडे देण्यासाठी तीन आमदारांनी मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना पत्र दिल्याचेही समजते. त्यामुळे घाटीच्या अधिष्ठातापदी डाॅ. सुक्रे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.