लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दरवेळी काही तरी हटके सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची परंपरा कायम राखत ‘कलासागर’ने रविवारी एका अभिनव नाट्यप्रयोगाचे आयोजन करून रसिकांना एक आगळावेगळा अनुभव दिला. ‘दि अक्युज्ड’ या हिंदी नाटकाचा संत तुकाराम नाट्यगृहातील प्रयोग शहरासाठी अभिनवच म्हणावा लागेल. अग्रज मिश्रा लिखित आणि प्राची रॉय दिग्दर्शित या ‘मर्डर मिस्ट्री’ नाटकाअंती मुख्य पात्र खुनाचा दोषी आहे की नाही याचा निर्णय घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर होती.इंदोर शहरातील एक प्रथितयश डॉक्टरवर आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप असतो. खुन्याच्या खटल्याची कार्यवाही म्हणजे ‘द अक्युज्ड - गिल्टी आॅर नॉट गिल्टी’ हे नाटक़ डॉ. पृथ्वी शहा यांची पत्नी आकांक्षा हिचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडल्यानंतर खुनाच्या आरोपाखाली त्यांच्यावर न्यायालयात खटला चालविला जातोे. मग येथून सुरू होतो कोर्टरूम ड्रामा. त्यांची वकील मिस वर्मा आणि विरोधी पक्षाचे वकील मि. सोनी हे एकमेकांचे साक्षीदार-पुरावे सादर करून आपली केस मजबूत करून एकमेकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडतात.आकांक्षाला तिच्या पतीने विष दिले की, या षड्यंत्रामध्ये आणखी दुसरे कोणी सहभागी आहे, याचा शोध वादी-प्रतिवादी घेतात. दोन्ही बाजूचे वकील आपापल्या पक्षकारांचे म्हणणे पे्रक्षकांसमोर मांडतात. प्रयोगात प्रेक्षकांवर न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रयोगाअंती दिलेल्या मोबाइल क्रमांकावर करून प्रेक्षकांनी एसएमएस पाठवून आपला निर्णय दिला. अशा प्रकारे प्रेक्षकांना नाटकात सहभागी करून घेण्याची कल्पकता भन्नाट होती. खुनी ओळखण्याचे काम आपल्याला करायचे म्हणून प्रेक्षक प्रयोगात सरमिसळून गेले होते.उत्तम नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीताचा वापर प्रयोगाचे वैशिष्ट्य ठरले. प्राची रॉय, पंकज वागळे, मयंक राजलीवाल, अभय गिद, अंतिम मार्केंडेय, सूरभी वाधवानी, निधी उपाध्याय, अतुल वाधवाणी, संदीप सरवटे, विशाल पवार, यश द्रविड या कलाकारांनी उत्तम अभिनय करून ख-याखु-या कोर्टाचा अनुभव मंचवर उभा केला. जेफरी आर्चर लिखित याच नावाच्या इंग्रजी नाटकावर हे हिंदी नाटक आधारित आहे.
नाट्यरसिकांनी ठरविले खुनी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:28 AM