मुजीब देवणीकर
औरंगाबाद : मागील दोन दशकांमध्ये शहर चारही दिशांनी प्रचंड वाढले. वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले तरी मनपा प्रशासनाने नवीन जलकुंभ, जलवाहिन्या टाकल्या नाहीत. त्यामुळे शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहती आज पाण्याविना आहेत. या वसाहतींना टॅँकरद्वारे पाणी देण्याचे धोरण आठ वर्षांपूर्वी स्वीकारण्यात आले. एक प्रकारे ही राजकीय मंडळींचीच सोय होती. कारण ठेका राजकीय मंडळींनाच देण्यात आला. टॅँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी मनपा तब्बल ५ कोटी रुपये खर्च करीत आहे.
पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेक वसाहतींना पाणी मिळत नाही. आठ दिवसांतून एकदा एक ड्रम पाणी देण्यात येते. संबंधित नागरिकाने मनपाकडे ॲडव्हान्समध्ये पाण्याचे पैसे भरलेले असतील तरच पाणी देण्यात येते. एका कुटुंबाला एक ड्रम पाणी दिल्याने काय साध्य होते? याचा विचार मनपाने केला नाही. गोरगरीब नागरिकांनी पैसे भरले नाहीत, तर त्यांना पाणी दिले जात नाही. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील मंडळी मिळून पाणीपुरवठ्याचा ठेका चालवत होते. सत्ताधारी पक्षातील मंडळींनी नातेवाइकांच्या नावावर ठेका मिळविला आहे.
शहराला लागणारे टॅँकर व खर्च
२०१८- टँकर फेऱ्या - १,६४,२५०- खर्च- ४.७० कोटी
२०१९- टॅँकर फेऱ्या- १,५५, ४६७- खर्च -५ कोटी
२०२०- टँकर फेऱ्या- १,७०,६७०- खर्च- ५.५० कोटी
२०२१- टँकर फेऱ्या- ८५,३२,३२३ खर्च- ६ कोटी
टँकरचे पाणी कोणासाठी?
गुंठेवारी वसाहती, जिथे पाण्याची सोय नाही, तेथील लोकांसाठी टँकरची कल्याणकारी योजना सुरू केली. राजकीय मंडळींनी ठेका घेणे हेसुद्धा चुकीचेच आहे; पण अलीकडे जिथे नळाने पाणीपुरवठा होतो तेथेही टॅँकरने पाणी देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे चुकीचे आहे. मनपाचे पाणी फिल्टर केलेले व महाग असते. त्याचा वापर फक्त पिण्यासाठीच झाला पाहिजे.
-नंदकुमार घोडेले, माजी महापौर
पाण्याचा मोठा आर्थिक घोटाळा
टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारा एक मोठा घोटाळा आहे. कोट्यवधी रुपयांची कमाई काही मंडळी टँकरच्या माध्यमातून करीत आहे. मंगल कार्यालये, रुग्णालये, ढाबे आदी व्यावसायिक ठिकाणी दररोज लाखो रुपयांच्या पाण्याची विक्री होते. त्यामुळे शहराला आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. हा ठेका मिळविण्यापूर्वी सत्ताधारी आघाडीवर होते. आता तर पालकमंत्र्यांपर्यंत विषय गेला होता.
-नासेर सिद्दीकी, माजी विरोधी पक्षनेता
टँकरचे पाणी कुठे मुरते?
टॅँकरद्वारे गोरगरीब नागरिकांना आम्ही पिण्यासाठी पाणी देतोय हे थोतांड आहे. गुंठेवारीतील कोणत्याही वसाहतीत जाऊन शहनिशा केली, तर मनपाच्या कंत्राटदाराची मनमानी, कर्मचाऱ्यांचा मस्तवालपणा निदर्शनास येईल. ५० रुपये ड्रमद्वारे अक्षरश: पाण्याची विक्री केली जाते. महापालिकेचा एकही अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी त्यांच्यावर कारवाई करीत नाही. गोरगरिबांना एवढे पैसे देऊन पाणी घेणे परवडत नाही.
-गणेश बनकर, विश्रांतीनगर
पहाटे शहराबाहेर महापालिकेचे टँकर कशासाठी जातात. शहराबाहेर पहाटे कोणत्या वसाहतींना पाणीपुरवठा होतो. याचे उत्तर महापालिकेने द्यायला हवे. मागील अनेक वर्षांपासून पाण्याचा अक्षरश: काळाबाजार सुरू आहे. महापालिका प्रशासन, सत्ताधारी सर्व मूग गिळून गप्प का? आहेत.
-राहुल जाधव, जाधववाडी