औरंगाबाद : दख्खन काबीज करण्यासाठी आलेला मुघल सम्राट बादशहा औरंगजेबाचा ‘जनाना’ हा महाल होता. मुघलकालीन वास्तूचा उत्कृष्ट नमुना असलेली ही ऐतिहासिक वास्तू मात्र काळाच्या ओघात व दुर्लक्षामुळे खंडहर बनली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या वास्तूचा ‘कोणी वाली’ आहे की नाही, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
पर्यटनाची राजधानी औरंगाबादेत समुद्र वगळता सर्वच ऐतिहासिक वारसा लाभला आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबाने किलेअर्क भागात आपली राजधानी वसवली. ‘किलेअर्क’ हे त्याचे निवासस्थान होते. असे म्हणतात की, विद्यमान शासकीय ज्ञान व विज्ञान आणि कला महाविद्यालयाच्या जागेत जवळपास ३ लाख चौरस फूट जागेत हा किल्ला होता. या किलेअर्कमध्येच मर्दाना महाल, जनाना महाल, कचेरी, तहखाने, तोफा लावलेले बुरूज, सुभेदारी, नहरी, कारंजी, महालाच्या उत्तर बाजूला हिमायत बाग, असा शाही परिसर होता. मर्दाना महालात राजदरबार, विविध खलबतखाने, मोठमोठे कमानदार हॉल होते.
जनाना महाल ही त्या काळात शहरातील सर्वात उंच इमारत होती. या महालातून संपूर्ण शहर दिसत असे. किलेअर्कचा परिसर एवढा मोठा होता की, येथे संपूर्ण फौज किल्लेदार आणि त्यांचे शिपाई यांची व्यवस्था करण्यात आली होती. भटारखाने, हमामखाने, पिलखाने, वाहत्या पाण्याच्या रंगीत चादरींचे लांबलचक हौद, नक्षीकाम केलेल्या भिंती आणि कमानी. मर्दाना ते जनाना महालात जाण्यासाठी जिन्यांचा रस्ता. शाही महाल येथे उभे होते.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात या महालाकडे दुर्लक्ष झाले; पण १९७१ मध्ये जनाना महाल येथे शासकीय कला महाविद्यालय सुरू करण्यात आले. २००४ साली कला महाविद्यालय बाजूच्या नवीन इमारतीत स्थलांतरित झाले. त्यानंतर या ऐतिहासिक वास्तूला कोणी वाली राहिला नाही. येथील दरवाजे, खिडक्या चोरीला गेल्या. काही ठिकाणी छत कोसळले. ही वास्तू आज शेवटची घटका मोजत आहे. या वास्तूकडे ना मनपा लक्ष देते ना, पुरातत्व विभाग. ही वास्तू नेमक्या कोणाच्या ताब्यात आहे, हेच कळत नाही. कारण, या वारशाचे जतन, संवर्धन करण्याऐवजी तिच्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. शासकीय विज्ञान महाविद्यालयाकडील मर्दाना महलाचा काही भाग अजून तग धरुन आहे. हीच समाधानाची बाब होय.
पुरातत्व सल्लागार समितीच्या अहवालाचे काय झालेएप्रिल २०१७ मध्ये तत्कालीन मनपा आयुक्तांनी पुरातत्व सल्लागार समितीची बैठक घेऊन त्यात किलेअर्कची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. ४खंडहर झालेल्या महालाची पाहणी करून त्यानुसार या समितीने अहवाल तयार केला होता; पण नंतर या अहवालाचे काय झाले, हे कळू शकले नाही.
‘आर्ट गॅलरी’ उभारण्याची मागणी जनाना महालची इमारत वाचविण्यासाठी शासकीय कला महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘शाकम कनेक्ट’ या नावाने संघटना स्थापन केली. १६ आॅगस्ट २०१५ मध्ये या संघटनेतर्फे जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी परिसराची साफसफाई केली होती. ४या ऐतिहासिक जागेवर ‘आर्ट गॅलरी उभारण्यात यावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. मात्र, त्यावर आजपर्यंत काहीच निर्णय झाला नसल्याचे संघटनेचे किशोर निकम यांनी सांगितले.