औरंगाबाद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार? महाविकास आघाडीत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 11:55 AM2019-12-06T11:55:59+5:302019-12-06T12:00:09+5:30
सिल्लोड, वैजापूर, कन्नड आणि पैठण तालुक्यांतील सदस्यांमध्ये चुरस
- राम शिनगारे
औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीला १५ दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राज्यात सत्तास्थानी आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील पक्षच जि. प. मध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांचा कार्यकाळ २१ सप्टेंबर रोजी संपणार होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे राज्य शासनाने विद्यमान पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा कार्यकाळ वाढवून दिला होता. हा वाढविलेला कार्यकाळ २१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत एकूण ६२ सदस्य आहेत. त्यापैकी प्रा. रमेश बोरनारे हे विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे जि.प.मध्ये ६१ सदस्य असणार आहेत. यात शिवसेना १८, काँग्रेस १६, भाजप २३, राष्ट्रवादी काँग्रेस २, मनसे व रिपाइं (डेमोक्रॅटिक) पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ हे ३६ पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्याची शक्यता मावळली आहे.
जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विद्यमान अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर या पुन्हा अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगावकर हे पुन्हा अध्यक्षपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांतराच्या चर्चा त्यांना अडचणीच्या ठरणार आहेत. याशिवाय सदस्या स्वाती निरफळ, शुभांगी काजे, मोनाली राठोड, पार्वताताई जाधव, वैशाली पाटील, सविता चव्हाण यांचीही नावे चर्चेत आली आहेत.
राज्य शासनामध्ये पैठण तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यास अध्यक्ष हा सिल्लोड तालुक्यातील आणि सिल्लोड तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यास पैठण तालुक्यातील जि.प. अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे समर्थक मानले जाणारे केतन काजे यांच्या पत्नी शुभांगी काजे यांचेही पारडे तुल्यबळ असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शुभांगी काजे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नीचा पराभव केला होता, तेव्हापासून खैरे आणि जाधव यांच्यात वितुष्ट आले होते. त्यानंतर घडलेल्या राजकारणात केतन काजे यांनी खैरे यांना सक्षमपणे साथ दिलेली आहे.
काँग्रेसलाही अध्यक्षपदाची अपेक्षा
जि.प.मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस पक्षाने साथ दिली होती. शिवसेनेचे १८ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसही उर्वरित सव्वा दोन वर्षांच्या अध्यक्षपदावर दावा करण्याची शक्यता आहे. यासाठी विद्यमान सभापती मीनाताई शेळके यांचे नाव आघाडीवर आहे. मीनाताई शेळके यांचे पती काँग्रेसचे फुलंब्री तालुकाध्यक्ष असून, कल्याण काळे यांचे समर्थक आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आलेली असल्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिवसेना अध्यक्षपद सोडण्याची शक्यता कमीच आहे. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अद्यापही मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली नसल्याचे समजते. मात्र, भाजपकडून अनुराधा चव्हाण यांचे नाव आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.