छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून बसलेले संचालक उपाध्यक्षपद तरी मिळावे, यासाठी मोर्चेबांधणी करीत राहतील; पण वेळेवर मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि आ. हरिभाऊ बागडे ठरवतील, त्याच्याच गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार, असे मानले जात आहे. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून ती उपाध्यक्षाविनाच होईल.
बँकेत सध्या संचालकांचे पक्षीय बलाबल असे आहे : शिवसेना शिंदे गट- आठ, भाजप- चार, शिवसेना ठाकरे गट- तीन, काँग्रेस- तीन, राष्ट्रवादी काँग्रेस- एक, बीआरएस- एक, एकूण- २०. बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे पाटील हे अध्यक्ष बनल्याने त्यांचे उपाध्यक्ष हे पद रिक्त बनले आहे. आता या पदासाठीही निवडणूक प्रक्रिया राबवावी लागेल. ती प्रक्रिया सहकार प्राधिकरणाकडून मंजूर होऊन येईल. त्यासाठी सहकार सहसंचालकांकडून प्रस्ताव पाठवावा लागेल. यासाठी किमान महिना लागेल.
पक्षीय बलाबलात सर्वात मोठा गट असलेल्या शिंदे गटाला अध्यक्षपद मिळाले आहे. नितीन पाटील यांच्या रूपाने ते पूर्वीही मिळाले होतेच. सहकारात राजकीय पक्ष बाजूला ठेवून समीकरणे जुळवली जातात, हे खरे आहे; पण आता शिंदे गटाखालोखाल भाजपचे संख्याबळ चार आहे. संख्याबळाच्या आधारे भाजपला उपाध्यक्षपद हवे आहे. भाजपचा दावा मानला गेला तर बागडे हे ठरवतील, त्याच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडेल, असे मानले जात आहे. अर्थात निवडणूक म्हटल्यानंतर ‘अर्थकारण’ गृहित धरले जातेच. तसे झाले तर मग ‘गुवाहाटी’ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तसे घडले नाही, हे विशेष.
सध्या बँकेचे संचालक मुंबईत असून रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना शासनाकडे वर्ग व्हावी व याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर व्हावा, यासाठी ते मुख्यमंत्र्यांना साकडे घालत आहेत. तर बँकेचे व्यवस्थापन १८ सप्टेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तयारीत मग्न आहे.