महायुतीकडून पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, एमआयएमकडून इम्तियाज जलील तर शिवसेना शिंदेकटाकडून संदिपान भूमरे मैदानात असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, छत्रपती संभाजीनगरात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, खैरे साहेबांची म्हणजेच आमच्या शिवसेनेची खरी फाइट एमआयएमसोबत असेल, असे शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
दानवे म्हणाले, "शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी सिद्ध झाली आहे. कारण शिवसेना प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वचा करिश्मा येथे सातत्याने राहिलेला आहे. शिवसेना प्रमुखांच्या स्वर्गवासानंतर उद्धव ठाकरेही येथे सातत्याने आले आहेत. महापालिका असतील विधानसभा असतील, लोकसभा असतील शिवसेनेने सातत्याने जिंकल्या आहेत आणि ही निवडणूकही आम्ही जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे."
संदिपान भुमरे यांच्या आव्हानासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, "संदिपान भुमरे हे आव्हान असेल असे वाटत नाही. आमची लढत एमआयएम सोबत होईल, असे मला आताच्या घडीला तरी वाटते. भविष्यात सांगता येत नाही. पण आताच्या घडीला पाहिले तर एमआयएम सोबतच खैरे साहेबांची म्हणजेच आमच्या शिवसेनेची फाइट होइल असे दिसते." दानवे एबीपी माझासोबत बोलत होते.
संदिपान भुमरेंसंदर्भात काय म्हणाले दानवे? -अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "भुमरे हे शेतकरी आहेत. ते शेतकरी असताना दहा-दहा, अकरा-अकरा विदेशी दारूची दुकानं कशी आली, हा एक प्रश्न आहे. वर्षा नू वर्षे व्यवसाय करणाऱ्या लोकांना एकाचे दोन दुकान व्हायला वेळ लागतो. एकाची दुसरी करायला त्याचं अर्ध आयुष्य जातं आणि यांच्या गेल्या वर्ष-दोन वर्षात 11-11 दुकानं या जिल्ह्यात झाले. हा एक मुद्दा आहे."