छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच एमआयएम पक्षात पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या बरीच आहे. मात्र, संधी कोणाला मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाला भरभरून मतदान झाल्यानंतर हाच ट्रेंड विधानसभेत कायम राहत नाही. २०१९ मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील यांना पूर्वमधून ९२ हजार, पश्चिम मतदारसंघात ७१ हजार, मध्य विधानसभा मतदारसंघातून ९९ हजार मते मिळाली होती. सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमला पूर्वमध्ये ८० हजार, मध्य मतदारसंघात ६८ हजार मते मिळाली होती. पश्चिम मध्ये तर एमआयएम ३९ हजारांवरच थांबले होते. तिन्ही मतदारसंघात एमआयएमला विधानसभेत १ लाख ८७ हजार मते मिळाली होती. लोकसभेला २ लाख ६३ हजार मते मिळाली होती. विधानसभेला एमआयएमला तब्बल ७५ हजार कमी मते मिळाली होती. विधानसभेला एमआयएम सोबत वंचित बहुजन आघाडीसोबत नव्हती.
२०२४ लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर असे लक्षात येते की, शहराच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांना २ लाख २९ हजार मते मिळाली. पूर्वमध्ये ८९ हजार, मध्य मतदारसंघात ८५ हजार, तर पश्चिममध्ये ५४ हजार मते मिळाली. पूर्व आणि मध्य मतदारसंघातील मतांचा आकडा सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावणारा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी अत्यंत सावध पवित्रा घेणार हे निश्चित.
उमेदवार कोण राहणार ?मध्य विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये मनपातील माजी गटनेता नासेर सिद्दीकी यांना एमआयएम पक्षाकडून संधी देण्यात आली होती. त्यांच्यासह पक्षातील अन्य मंडळीही यंदा विधानसभेसाठी बरेच इच्छुक आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी लोकसभेला घाम गाळला. त्याचप्रमाणे पूर्वमध्ये पक्षाच्या कार्याध्यक्ष यांना २०१४, २०१९ मध्ये पक्षाने संधी दिली. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. आता पक्ष तिसऱ्यांदा त्यांना संधी देईल किंवा नाही, याबाबत पक्षातच संभ्रम आहे. या ठिकाणीही इच्छुकांची रांग लागलेली आहे.
मत विभाजनावर गणित अवलंबूनदोन्ही मतदारसंघात एमआयएमला निवडून येणे एवढे सोपेही राहणार नाही. एमआयएमला २०१४ मध्ये मध्य मतदारसंघात संधी मिळाली होती. हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले तरच एमआयएमला संधी मिळू शकते. फक्त मुस्लिम मतांवर उमेदवार निवडून आणणे शक्य नाही.