औरंगाबाद : विद्यापीठाशी संबंध नसलेल्या दोन संस्थांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दुसऱ्याचे ओझे आपल्या खांद्यावर वाहून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटत आहे. पैठण येथील बंद पडलेले संतपीठ विद्यापीठाने चालवावे, असा प्रस्ताव राज्याच्या सांस्कृतिक विभाग आणि उच्चशिक्षण विभागाने विद्यापीठाला दिला. दोन्ही खाती विनोद तावडे यांच्याकडे असल्याने हा प्रस्ताव विद्यापीठाने स्वीकारला. अनेकांनी विद्यापीठाच्या या भूमिकेचे स्वागतच केले आहे. मात्र, या केंद्रासाठी विद्यापीठाने आपल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे.पैठणच्या संतपीठासाठी विद्यापीठाने ५० लाखांची तरतूद केली आहे. राज्य सरकारने संतपीठासाठी सांस्कृतिक विभागाकडे असणारी आर्थिक तरतूद वळविण्यासंबंधी अद्याप विद्यापीठाला काहीही कळविलेले नाही. असे असताना केवळ राजकीय दबावापोटी विद्यापीठ संतपीठासाठी विद्यापीठाच्या फंडातून रक्कम खर्च करणार आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेसाठी ५ कोटी एवढ्या भल्या मोठ्या रकमेची तरतूद केली आहे. मुळात विद्यापीठात मुंडे यांच्या नावाने अध्यासन केंद्राचा विचार असताना राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेचा २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला.या संस्थेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात एक छदामही दिला नाही. मात्र, विद्यापीठाने ५ कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद केल्यासंदर्भात आश्चर्य व्यक्त होत आहे.निवडून आलेली सिनेट अस्तित्वात नसल्याने राजकीय दबावापोटी विद्यापीठाने ही तरतूद आपल्या अर्थसंकल्पात केली आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशनचे (बामुक्टो) जिल्हाध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे संस्थेसाठी विद्यापीठाची शंभर एकर जागा देण्यास आमचा विरोधआहे. राज्य शासनाने त्यांच्या पैशातून ही संस्था इतरत्र कोठेही उभारावी. विद्यापीठानेही अर्थसंकल्पात केलेली तरतूद रद्द करून ती रक्कम विद्यार्थी कल्याणाचे प्रकल्प राबविण्यासाठी वापरावी.
कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर
By admin | Published: April 05, 2016 12:30 AM