औरंगाबाद : दुचाकी समोर आडवा आल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने शनिवारी दुपारी अटक केली. २१ जानेवारी रोजी रात्री मिल कॉर्नर परिसरातील टेक्सस्टाईल मिल जवळ ही घटना घडली होती. तेव्हापासून गंभीर जखमी नारायण कचरू गवई (५३, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) हे घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
शेख बशीर शेख वजीर (२१, रा.मुजीब कॉलनी) आणि शेख इमरान शेख वजीर (२०,रा. दानिश पार्क, नारेगाव ) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, नारायण गवई हे गुरुवारी रात्री मध्यवर्ती बस स्थानकाकडून घरी जात होते. यावेळी दुचाकीस्वार आरोपीसमोर ते आले. त्यांच्यात भांडण सुरू झाले. आरोपीने अचानक धारदार चाकूने गवळी यांच्या पोटात तीन वार केले. या घटनेत गंभीर जखमी होऊन गवळी खाली कोसळले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराकडून आरोपींचे वर्णन मिळवले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. मात्र रात्रीची वेळ असल्याने आरोपींचे चेहरे आणि गाडीचा नंबर त्यांना मिळाला नव्हता. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, कर्मचारी शेख नजीर, सतीश जाधव, सुधाकर मिसाळ, रवींद्र खरात, सूनील बेलकर आणि विजय पिंपळे यांनी तपास करून संशयित आरोपी मुजीब कॉलनी येथील शेख बशीर असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी शनिवारी दुपारी बशीरला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आरोपी शेख इम्रान याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली. पुढील तपासासाठी आरोपींना क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक जी. पी. सोनटक्के तपास करीत आहेत.