छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजीतदादा पवार यांच्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. ११ आणि १२ डिसेंबर रोजी राज्य मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार होईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे सिडकोचे अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ता आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.
आमदार शिरसाट यांनी शुक्रवारी दुपारी त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काल मोठ्या थाटात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला अनेक जण निमंत्रण देऊनही गैरहजर राहिले. ते लोक दुर्देवी आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय भाजपची शपथ घेण्याची तयारी होती. हे समजल्याने ऐनवेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा टोला शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी लगावला, याकडे कसे पाहता, असे विचारले असता आ. शिरसाट म्हणाले की, राऊत यांचा आरोप म्हणजे चांगल्या कार्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, यासाठी दोनवेळा फडणवीस हे शिंदे यांना येऊन भेटले. शिवाय आमच्या आमदारांचा आग्रह आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी शिंदे यांनी शपथ घेतली, असा खुलासा शिरसाट यांनी केला.
मंत्रीमंडळात कोण असेल याचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतीलमंत्रीमंडळात समावेश व्हावा, यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या नेत्यांना भेटून लॉबिंग करताना दिसतात, याकडे लक्ष वेधले असता आ.शिरसाट म्हणाले की, अशाप्रकारे कोणी कोणाला भेटल्याने मंत्रीमंडळात वर्णी लागत नसते.मंत्रीमंडळात कोण असेल याचा निर्णय तिन्ही नेते घेणार आहेत. तुमच्या मंत्रीपदाचे काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, माझ्याही मंत्रीपदाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील.
नदीजोड प्रकल्प मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणारामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटनंतर पत्रकारांशी बोलताना राज्यातील आणि विशेषत: मराठवाड्यातील प्रस्तावित आणि मंजूर करण्यात आलेला नदीजोड प्रकल्प, वॉटरग्रीड सारख्या योजना मार्गी लावण्याविषयी बोलले. यामुळे हे प्रकल्प मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणारे आहेत. हे प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावेत, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.