छत्रपती संभाजीनगर : राज्यातील तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता जिल्हानिहाय जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत. याबाबत शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश जारी केला आहे. अध्यादेश येईपर्यंत उपविभागीय पातळीवर बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे तलाठ्यांना सोयीनुसार बदली करून घेणे शक्य होते. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण अधिकार गेल्यामुळे कुठे नाराजीचा तर कुठे आनंदाचा सूर उमटत आहे.
जे तलाठी आपापल्या विभागात अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. परंतु ज्यांना विभाग बदलून दुसऱ्या विभागात जायचे आहे, त्यांना मात्र या निर्णयामुळे आनंद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर उपविभागातील तलाठ्यांची याच विभागात बदली होत असे. परंतु आता शासन निर्णयामुळे पूर्ण जिल्ह्यात कुठेही बदली होऊ शकते. राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांना प्रतिक्रिया विचारली असता या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे शासनाचा निर्णय.....तलाठी गट क संवर्गाचे नियुक्ती अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. तलाठ्यांची बदली जिल्ह्यात करण्यात येईल. सेवाज्येष्ठतेची सूची जिल्हास्तरावर ठेवण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही.
का घेतला शासनाने निर्णय.....एक किंवा दोन तालुक्यांत पूर्ण सेवा दिल्यास कामामध्ये सारखेपणा येऊ शकतो. अनेक तलाठी उपविभागाबाहेर बदलीसाठी प्रयत्न करीत असतात. परंतु, उपविभाग पातळीवर ते शक्य होत नाही. तसेच तलाठ्यांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत गुंतागुंत होऊन त्यांचे नुकसान होते. यातून काही प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर तलाठी आस्थापनेचा निर्णय झाल्यास जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते.