औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा राज्यात पिछाडीवर पडला आहे. ५५ टक्क्यांवरच जिल्ह्याची गाडी थांबली आहे. देशभरात काही जिल्ह्यांची अवस्था औरंगाबादसारखीच आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi will Know reason of low Corona vaccination:) पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
मागे राहण्याची कारणमीमांसा स्पष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील काही प्रमुख अधिकारी देखील सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचे एकूण प्रमाण सध्या ५५ टक्के आहे. त्यात पहिला डोस घेणारे ५५, तर दुसरा डोस घेणारे २२ टक्के नागरिक आहेत. ३२ लाख २४ हजार ७७६ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. १७ लाख ७४ हजार २७२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस, तर ७ लाख २६ हजार ६३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महापालिका हद्दीत १० लाख ५५ हजार ६५४ पैकी ६ लाख ३ हजार १८९ नागरिकांनी पहिला डोस, तर ग्रामीण भागात २१ लाख ६९ हजार २३ पैकी ११ लाख ७१ हजार ८३ नागरिकांनी पहिला डोस घेतला. ग्रामीण भागात ३ लाख ६ हजार १२३ जणांनी, तर ३ लाख ६५ हजार ५७४ शहरातील नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
काय आहेत पिछाडीची कारणे ?लसीकरणात जिल्हा मागे राहण्याची विविध गैरसमज, अफवांसारखी काही कारणे आहेत. विशिष्ट धर्मांच्या लोकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. ज्यांना परदेशात जायचे आहेत, तेच लस घेत आहेत. इतर लोक लसीकरणासाठी पुढे येत नसल्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढत नसल्याचे दिसत आहे.