औरंगाबाद : विशेष पोलीस महानिरीक्षकांची गाडी दंगेखोर फोडतात, शिवाय त्यांच्यामुळे तीन दिवस संपूर्ण शहर तणावाखाली होते, अशा वेळी हवेत गोळीबार करण्याऐवजी त्यांना प्लास्टिक गोळ्या का घातल्या नाहीत, असा सवाल पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकार्यांना विचारला. १२ जानेवारीपर्यंत रजा मंजूर असताना शहरात दंगल पेटल्याचे कळताच पोलीस आयुक्त ४ जानेवारी रोजी सिंगापूर येथून औरंगाबादेत परतले आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक घेतली.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त यादव म्हणाले की, पोलिसांना देण्यात आलेल्या प्लास्टिक गोळ्या (बुलेट) दंगलखोरांच्या कमरेखाली लागाव्यात असा मारा करण्याच्या सूचना असतात. प्लास्टिक गोळ्या लागल्यामुळे कोणीही मृत्युमुखी पडत नाही, मात्र तीन ते चार दिवस त्यांना त्याचा त्रास होतो आणि कोणीही दंगा करण्याचे धाडस करीत नाही. १ जानेवारी रोजी रात्री आपण औरंगाबादेतून रजेवर गेलो तेव्हा शहरात एक जमाव जमला होता आणि पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले होते. दुसर्या दिवशी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि ठिकठिकाणी दगडफेक आणि वाहने जाळण्याचे प्रकार होण्यास सुरुवात झाली. तीन दिवस शहरात ही दंगल सुरू होती. याविषयी माहिती मिळताच आपण रजा अर्धवट सोडून औरंगाबादेत परतलो; मात्र तीन दिवसांत शहरात शांतता प्रस्थापित करण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले होते.
दोन दिवसांपासून शहरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दंगलीच्या काळात पोलिसांवर दगडफेक करणार्यांविरोधात लाठीहल्ला, अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यासोबतच पोलिसांनी प्लास्टिक गोळ्यांच्या हवेत ५३ फैरी झाडल्या. हवेत गोळीबार केल्याने त्याचा परिणाम दंगलखोरांवर होत नाही. उलट दंगलखोरांच्या कमरेखाली प्लास्टिक गोळ्या झाडल्यास त्यांना दुखापत होते; मात्र मृत्यू होत नाही आणि मात्र कायमचा त्यांना जरब बसतो.
दंगाकाबू नियंत्रण पथकाची स्थापनादरम्यान, शहरात उद्भवणार्या अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी दंगा नियंत्रण पोलीस पथक (आर.सी.पी.) स्थापन करण्यात आले. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे या पथकाच्या प्रमुख आहेत. या पथकात ४० जवान असतील. दंगेखोरांना कमरेखाली प्लास्टिक गोळ्या कशा माराव्यात, याबाबतचे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.