औरंगाबाद : साहेब, पुंडलिकनगर रोडवर दोन बीअर बार आहेत, या बार समोरुन येता जाता लोक आमच्या तोंडाकडे का पाहतात? असा गंभीर व संवेदनशील प्रश्न इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या रोशी शेळके या विद्यार्थिनीने पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना केला आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने पुंडलिकनगर येथील एका मंगल कार्यालयात स्नेहमिलन घेण्यात आले. व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त किशोर नवले उपस्थित होते. आयुक्तांच्या सूचनेनंतर नागरिकांनी त्यांचे प्रश्न, सूचना आणि मुद्दे मांडले. शहरातील एका शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेली रोशी शेळके आईसह उपस्थित होती. पोलीस आयुक्तांसमोर मोठ्या हिमतीने तिने गंभीर प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली साहेब, पुंडलिकनगर रोडवर ऋतुजा आणि हॉटेल शैलेश हे बीअर बार आहेत. तेथे उभे राहणारे लोक मुली व महिलांकडे टक लावून पाहतात. तर दुसरा मुद्दा मांडताना तिने पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या महिलांना येथील पोलीस घरातील भांडण घरातच मिटवा, असा सल्ला देतात. वाद जर घरात मिटला असता तर महिलांना पोलीस ठाण्याची पायरी कशाला चढावी लागली असती, असा सवाल तिने उपस्थित केला. शाळकरी मुलीने उपस्थित केलेले मुद्दे आणि प्रश्नाने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. माजी नगरसेविका मीना गायके, माजी नगरसेवक संतोष खेंडके, राजाराम मोरे, डॉ. उल्हास उढाण, ॲड. माधुरी अदवंत यांच्यासह ३३ नागरिकांनी सामाजिक प्रश्न मांडले. या उपक्रमासाठी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पुढाकार घेतला. उपनिरीक्षक मीरा चव्हाण, विकास खटके, दामिनी पथकाच्या फौजदार स्नेहा करेवाड आणि पोलिसांनी त्यांना मदत केली.
घनश्यामचे कौतुक थांबवा, सूचना द्यायावेळी प्रत्येक जण पोलीस आयुक्तांना पुंडलिकनगर ठाण्याचे प्रमुख सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे कसे चांगले अधिकारी आहेत, असे सागत आणि नंतर त्यांचा प्रश्न मांडत असत. हे पाहून पोलीस आयुक्तानी घनश्याम सोनवणे यांचे कौतुक थांबवा आणि सूचना सांगा, असे नागरिकांना सुनावले.
आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावणारया संमेलनाचा समारोप करताना पोलीस आयुक्तांनी सर्व प्रश्नांचा अभ्यास करून आठ दिवसांत ते सोडविण्याची ग्वाही दिली. शिवाय महिनाभरानंतर पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन दिले.