औरंगाबाद : संशोधन अधिमान्यता समितीसमोर (आरआरसी) विषयांचे सादरीकरण व मुलाखती दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादी लावण्याची प्रक्रिया विद्यापीठात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. विद्यापीठ संकेतस्थळावर ही यादी जाहीर केली जाणार असून, ८,९,१० जानेवारी असे तीन दिवस विद्यार्थ्यांकडून आक्षेप मागविले जाणार आहेत. समितीमार्फत प्राप्त आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर १२ जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी व पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, मागील शनिवारी सात विषयांची निवड यादी जाहीर केली होती. मात्र, निवड न झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली होती. त्यामुळे ‘आरआरसी’समोर पीएच.डी. विषयांचे सादरीकरण व मुलाखती देणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची सामान्य गुणवत्ता यादी जाहीर केली जात आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना गुण कुठे कमी पडले, कोणते गुण वाढले, याची स्पष्ट माहिती मिळेल व पारदर्शकता वाढेल. यामुळे सामान्य गुुणवत्ता यादी जाहीर करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड होईल. त्यानंतर शनिवारपासून तीन दिवस विद्यार्थ्यांचे आक्षेप स्वीकारून तज्ज्ञ समितीमार्फत त्याची पडताळणी (रिड्रेसल) केली जाईल. अगोदर जाहीर झालेल्या ७ विषयांच्या निवड यादीबद्दल आलेल्या आक्षेपांचेही निरसन केले जाईल. अगोदरच पीएच.डी. प्रवेशासाठी विलंब झाल्यामुळे सुरुवातीला थेट निवड यादी जाहीर केली होती.
आदेशांची प्रतीक्षाकोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे विद्यापीठांतील शैक्षणिक विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू ठेवावे की नाहीत, याबद्दल संभ्रम आहे. महाविद्यालयांना विद्यापीठाच्या सूचनांची, तर विद्यापीठ प्रशासनाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे काही महाविद्यालयांमध्ये दैनंदिन तासिका व प्रात्यक्षिके सुरू आहेत. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात विद्यापीठाने ८ फेब्रुवारीपासून सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. मात्र, परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन घ्यावी, याबद्दल शासनाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नसल्यामुळे परीक्षेचे नियोजन खोळंबले आहे.
वसतिगृहांची मनपाकडून पडताळणीशहरातील काही महाविद्यालयांनी वसतिगृहे रिकामी केली असून, मनपाने दोन दिवसांपासून त्यांची पडताळणीही केली आहे. विद्यापीठातील वसतिगृहामध्ये सध्या ३५ विद्यार्थी राहात आहेत. विद्यापीठात ३७० विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत असून, महाविद्यालयांमध्ये हा आकडा ७५० च्या घरात आहे़