छत्रपती संभाजीनगर : मला कमी गुण मिळाले, घरात मला कोणीच मान देत नाही, मला मोबाइल दिला जात नाही, म्हणून स्वत:ला संपविण्याचे हे कारण असू शकते का? आत्महत्येची कारणे शोधली तर अशाच घटना समोर येतात. हल्ली १४ वर्षांची मुलेही म्हणतात, मला जगायचे नाही. तरुण-तरुणींमध्ये व्यसनाधीनता, झटपट यश मिळण्याची अपेक्षा, आदी कारणांनी आत्महत्या होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे म्हणाले, विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये आत्महत्येचे विचार बघायला मिळतात. नैराश्य अधिक प्रमाणात असते. बायपोलार मूड इलनेस, स्किझोफ्रेनिया आजारांची लक्षणे काही रुग्णांमध्ये आढळतात. मादक पदार्थांचे सेवन आणि आत्महत्या प्रवृत्ती एकत्र बघायला मिळते. डाॅ. प्रदीप देशमुख म्हणाले, ‘एनसीआरबी’ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
जिल्ह्यात ५२८ जणांची आत्महत्याग्रामीण भागात २०२३ मध्ये ५२८ जणांनी आत्महत्या केली. यात १४ ते १८ वर्षे वयोगटातील ११ जणांनी, तर १४ वर्षे वयोगटातील तिघांनी आत्महत्या केली.
अपयशातून पुढे जाणे शिकवामुलांना अपयशातून पुढे कसे जावे, हे पालकांनी शिकविले पाहिजे. मुलांची क्षमता ओळखून त्यांच्याकडून अपेक्षा केल्या पाहिजे. आत्महत्येचा प्रयत्न करणारे अगदी १० वर्षांच्या मुलांपासून तरुण, ज्येष्ठ रुग्ण उपचारासाठी येतात.- डॉ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ
ही तर इमर्जन्सीआत्महत्येचे विचार येणे, तसा प्रयत्न करणे या गोष्टी मानसोपचारशास्त्रामध्ये इमर्जन्सी मानली जाते. अति नैराश्य तसेच सायकोसिस या आजारात आत्महत्या प्रामुख्याने आढळून येतात.- डाॅ. आनंद काळे, मनोविकारतज्ज्ञ
ही चिंतेची बाबहल्ली १३ ते १४ वर्षांचे मूलही सहज आत्महत्याविषयी बोलून जाते. मला जगायचे नाही. मरावे वाटते, असे ते म्हणते. तिशीच्या आतील आत्महत्येचा विचार येणारी किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ही चिंतेची बाब आहे- डाॅ. संदीप सिसोदे, समुपदेशक
...तर गांभीर्याने घ्यावेनैराश्य आणि मानसिक विकार ही कारणे हे जवळपास ७० टक्के आत्महत्या करणाऱ्यांमागे असतात. कोणी व्यक्ती जर आत्महत्येबाबत बोलत असेल तर ते गांभीर्याने घ्यावे. त्या व्यक्तीच्या संपर्कात राहावे.- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ
सात महिन्यांत ८३ शेतकऱ्यांची आत्महत्याछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते जुलैदरम्यान एकूण ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आजपर्यंत एकूण ६८३ व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले.- डाॅ. जितेंद्र डोंगरे, सहायक संचालक तथा मनोविकृतीशास्त्रज्ञ