(स्टार ११३२)
प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : सिलिंडरच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. पेट्रोल, डिझेलपेक्षा गॅस सिलिंडरच्या किमती झपाट्याने वाढत असून, नुकतेच २५ रुपयांनी सिलिंडर महाग झाले आहे. आजघडीला ८९३.५० रुपयांना सिलिंडर खरेदी करावा लागत आहे.
सिलिंडरने घरगुती बजेट कोलमडले आहे. आता सिलिंडरचा दर १ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी १३१.५० रुपये बाकी आहेत. दरमहिन्याला सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यापेक्षा त्याची किंमत एकदाच हजार रुपये करून टाका, असा संताप गृहिणी व्यक्त करीत आहेत. कारण, जानेवारीपासून आजपर्यंत सिलिंडरची किंमत १९०.५० रुपयांनी वाढली आहे. आजपर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे. गावाकडे तरी चुली पेटविता येतात, फ्लॅटमध्येही आता चूल पेटवावी काय, असा प्रश्न गृहिणी विचारत आहेत.
चौकट................................
दर महिन्याला नवा उच्चांक
महिना - वर्ष (दर रुपयांत)
डिसेंबर (२०२०) - ६५३ रु.
जानेवारी (२०२१) - ७०३ रु.
फेब्रुवारी - ७७८ रु.
मार्च - ८२८ रु.
एप्रिल - ८१८ रु.
मे - ८१८ रु.
जून - ८१८ रु.
जुलै - ८४३ रु.
ऑगस्ट - ८६८ रु.
सप्टेंबर - ८९३.५० रु.
---
चौकट
सबसिडी किती भेटते रे भाऊ
घरगुती गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, त्यावर नाममात्र सबसिडी दिली जाते. ३ रुपये २६ पैसे एवढी कमी सबसिडी की त्यात चांगल्या प्रतीचे चाॅकलेटही येत नाही. मागील वर्षी एप्रिल महिन्यात १६५.७६ रुपये सबसिडी मिळत होती. आता तर ग्राहकांना बँक खात्यात सबसिडी जमा होते की नाही हेसुद्धा समजत नाही. अनेकांना सबसिडी किती भेटते हेही माहिती नाही.
चौकट..................
व्यावसायिक सिलिंडरही महाग
ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक सिलिंडर १,६६१ रुपयांना मिळत होता. तो आता १,७३६ रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. म्हणजे महिनाभरात ७५ रुपयांनी हा सिलिंडर महागला आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत २ हजार रुपये होण्यास २६४ रुपये एवढे बाकी आहे.
चौकट.................
महिन्याचे गणित कोलमडले
(प्रतिक्रिया )
कधी विचार केला नव्हता की, सिलिंडर ९०० रुपयांना खरेदी करावा लागेल. सिलिंडरच्या सततच्या भाववाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. फ्लॅटमध्ये राहून चूल पेटविण्याची वेळ आली आहे.
- अरुणा कुलकर्णी, उल्कानगरी
---
सिलिंडरऐवजी चूल बरी
सिलिंडर आता परवडत नाही. रॉकेल १०० रुपये लीटर आहे. तेही मिळत नाही. काळ्याबाजारात रॉकेल १६० रुपयांपर्यंत विकले जात आहे. महागाई अशीच वाढत राहिली, तर वखारीतून लाकडे आणून चूल पेटवावी लागेल.
- बाविस्कर, गांधीनगर
--------------