औरंगाबाद : शहरात दंगल उसळण्यामागे महापालिकाच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. मोतीकारंजा भागात अवैध नळ कनेक्शन कापण्याच्या कारणावरून दोन गटांत भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान दंगलीत झाल्याचा अंदाज आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी वादग्रस्त मोतीकारंजा भागातच अवैध नळ कापण्याचा निर्णय कशासाठी घेतला, असा प्रश्न महापौर नंदकुमार घोडेले यांनी उपस्थित केला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना खुलासा करण्याचा आदेशही त्यांनी दिला.
शहरात सव्वालाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन तोडावेत, असे आदेश सर्वसाधारण सभेत महापौरांनीच दिले होते. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दाखवीत मनपा अधिका-यांनी प्रारंभी कंटाळा केला. नंतर पोलीस बंदोबस्त मिळवून गुरुवारी मोतीकारंजा भागातील मुख्य जलवाहिनीवरील ४० पेक्षा अधिक नळ कापण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी परत दहापेक्षा अधिक नळ कापले. एका विशिष्ट समाजाचेच नळ कापले; दुस-या समाजाचे नळ का कापण्यात आले नाही, म्हणून वादाला सुरुवात झाली. दोन गटांत भांडण झाले. वादही काही वेळेत मिटला. या घटनेच्या दोन तासांनंतर शहागंज भागात समाजकंटकांनी दंगल घडवून आणली.
शनिवार आणि रविवारी महापालिकेला सुटी असल्याने सोमवारी सकाळीच महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मोतीकारंजा का निवडण्यात आला, असा प्रश्न करण्यात आला. चहेल यांनी उत्तर दिले की, या भागातील काही नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या होत्या. लोकशाही दिनातही तक्रारी होत्या, म्हणून या भागात कारवाई केली. हे उत्तर समाधानकारक नसल्याने लेखी खुलासा करण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले.