औरंगाबाद : समृद्धी महामार्गाच्या कामावरील मजुराच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने ८० हजाराला चुना लावल्याची घटना गुरुवारी घडली (Cyber crime in Aurangabad). विनोद भीमराव शहाणे (४१, रा. जयभवानीनगर, ह.मु. हर्सुल सावंगी) असे फसवणूक झालेल्या मजुराचे नाव आहे.
विनोद शहाणे यांनी दोन महिन्यापूर्वीच क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यावर एकही व्यवहार केलेला नाही. त्यामुळे सायबर भामट्याने मिस्ड कॉल केले होते. त्यावर संपर्क साधला असता महिलेने मी बँकेतून बोलत आहे, तुम्ही व्यवहार का केला नाही, त्यामुळे २००० चा दंड होऊ शकतो, अशी भीती दाखवली. तसेच मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून खात्यातील ७९,०१४ चा व्यवहार करून फसवणूक केली. या वेळी त्या महिलेने ६ वेळेस सतत फोन करून माहिती मागितली.
या व्यवहारानंतर काही वेळाने बँकेकडून लॅन्डलाईन क्रमांकावरून त्यांना एक कॉल आला की तुम्ही हा व्यवहार केला आहे का, तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बँकेत जाऊन तक्रार अर्ज दिला. फुलंब्री पोलीस ठाण्यातही तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलंब्री ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज तपास करीत आहेत.