औरंगाबाद : आजारपणामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला आयसीयूत भरती करावे लागते. आयसीयू म्हटले की, खासगी रुग्णालयच डोळ्यासमोर येते; परंतु अगदी खासगी रुग्णालयांप्रमाणेच चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० खाटांचे मॉड्युलर ‘आयसीयू’ साकारत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालयातही अत्याधुनिक उपचार मिळणार आहे.
जिल्हा रुग्णालयात आजघडीला ८ खाटांचे आयसीयू आहे. या आयसीयू सुविधेचा विस्तार केला जात असून ५० खाटांचे आयसीयू तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ५० खाटांच्या आयसीयूत २० खाटांचे मॉड्युलर ‘आयसीयू’ राहणार आहे. ‘आयसीयू’साठी आवश्यक इमारतीच्या बांधकामात बदल करण्याचे काम सध्या सुरू आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहून केंद्राने आरोग्याची पायाभूत सुविधा तत्काळ बळकट करण्याची योजना आखली होती. देशभरात मॉड्युलर रुग्णालये उभारण्याची केंद्राची योजना आहे. यामध्ये आयसीयू बेडसहित ऑक्सिजन सप्लायची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आले. याच धर्तीवर जिल्हा रुग्णालयातील ‘आयसीयू’चे बळकटीकरण करण्यात येत आहे.
मॉड्युलर ‘आयसीयू’त काय राहील?एअर हँडिलिंग यंत्रणा, स्वयंचलित खाटा (मोटराईज्ड बेड), अग्निरोधक यंत्रणा, व्हेंटिलेटर आदी अत्याधुनिक सुविधा राहील. सर्व प्रकारचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी केलेल्या अत्याधुनिक उपाययोजनांचा समावेश असलेले हे ‘मॉड्युलर आयसीयू’ राहील.
गोरगरीब रुग्णांना फायदाजिल्हा रुग्णालयात सध्या ८ खाटांचे आयसीयू आहे. आता ५० खाटांचे आयसीयू तयार केले जात आहेत. यात २० खाटांचे माॅड्युलर आयसीयू राहणार आहे. गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होईल.- डाॅ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक