योगेश पायघन
औरंगाबाद : जिल्हा परिषदेकडून पगार सातत्याने उशिरा होत असल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पगार वेळेवर न झाल्याने कर्जाचे हप्ते, देणेकऱ्यांची देणी थकल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शिक्षक आणि सर्वच शिक्षक संघटनांतून सीएमपी प्रणालीद्वारे पगार करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने सीएमपी प्रणालीने पगार करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात पगाराला विलंब होतो. तर दिवाळी, ईद वेळी पगार वेळेत करण्याच्या आग्रही मागण्या करूनही पगार होत नाही. त्यामुळे शिक्षकांच्या परिवारांचे आर्थिक गणित बिघडते. जिल्हा परिषदेत सर्वाधिक वेतनाचे कर्मचारी शिक्षण विभागातील आहेत. २०४० शाळांतील साडेनऊ हजार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी वित्त विभाग व शिक्षण विभागाकडे वारंवार शिक्षक संघटना निवेदने देतात. मात्र, आतापर्यंत तरी वेळेवर पगार होत नसल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सोबतचे मित्रपरिवारही शिक्षकच असल्याने तेही इच्छा असूनसुद्धा आर्थिक मदत करू शकत नाहीत. विलंबाने होणाऱ्या हप्त्यांच्या फेडीमुळे लागणाऱ्या दंडाचा आर्थिक भारही शिक्षकांनाच सोसावा लागत आहे. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत व्यस्त असलेल्या शिक्षकांच्या वेतनातील विलंब किमान कोरोना काळात तरी थांबवावा, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.
--
२०४०
जिल्ह्यातील जि. प. शाळा
--
९५००
एकूण शिक्षक
---
घराचे हप्ते वेळेवर कसे फेडणार?
दरमहा पगार द्यायचाच आहे. तो चुकणार नाही. मग, कशासाठी विलंब केला जातो? विलंबाला कोण जबाबदार? महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार मिळाला तर शिक्षकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. बँकेचे हप्ते, एलआयसी, देणेकऱ्यांची देणी दिली जातील. पैसा हाती नसेल तर सर्व पर्याय बंद होतात.
- राजेश हिवाळे, शिक्षक
इतरांकडे मदत मागण्याची वेळ येते
घरात एकच कमवती व्यक्ती तिचाच पगार जर वेळेवर आला नाही तर घराचे आर्थिक गणित कोलमडते. हक्काचा पगार वेळेवर न झाल्याने इतरांकडे मदत मागण्याची वेळ येते. पगार उशिरा झाल्याने गृहकर्ज, वाहनकर्ज, बँकेचे हप्ते, एलआयसी, सोसायटीचे हप्ते वेळेवर न भरल्यास दंडाचा भुर्दंड तर बसतो; मात्र, सिबिलवरही परिणाम होतो.
- वंदना तारो, शिक्षिका
--
प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे
पगार वेळेवर न झाल्याने घर कर्ज, बँकेच्या कर्जांचे हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. त्याच्या दंडाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यासाठी वेळेवर पगार होईल याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांत खाते सक्तीचे करून तेथे पगार झाल्यास बँकेच्या इतर सोयींचाही लाभ मिळेल.
- संतोष खेडकर, शिक्षक
---
महिन्याच्या शेवटी होतो पगार
दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्याच्या पगाराच्या विलंबाचा प्रश्न निर्माण होतो. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पगार होतात. त्यामुळे देणेकरी, बँकेचे हप्ते, घरखर्च, घरभाडे, वैद्यकीय खर्चामुळे आर्थिक कोंडी निर्माण होते. सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने त्या अडचणींत आणखी भर पडली आहे. त्यामुळे पगार महिन्याच्या पहिल्या दिवशी व्हावा. वेळेवर पगार होण्यासाठी सीएमपी प्रणालीने पगाराची मागणी सर्वच शिक्षक संघटनांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे.
---
आता सीएमपी प्रणालीद्वारे पगार
फेब्रुवारीत आयकराची कपात होते. मार्चच्या पगाराचे अनुदान १५ एप्रिलच्या पुढे येते. या वेळी ऑनलाइन तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे उशीर झाला. आता सीएमपी प्रणालीद्वारे पगारासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात खाते उघडून शिक्षकांनाही तिथे खाते उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे होणारा विलंब टळेल.
- सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी