औरंगाबाद : मनमाड ते नांदेडदरम्यानच्या एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाचे भूमिपूजन कोरोनाच्या वाढत्या विळख्यात अडकले आहे. परिणामी, विद्युतीकरणाच्या कामाला मुहूर्तच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. मराठवाड्यातील रेल्वेप्रश्न आधीच वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. आता मंजूर झालेले काम भूमिपूजनासाठी रेंगाळले आहे. कोरोनाची अडचण असेल तर भूमिपूजन न करता थेट कामाला सुरुवात करण्याची मागणी रेल्वे संघटनांकडून होत आहे.
मनमाड - नांदेड रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचा मार्ग काही दिवसांपूर्वीच मोकळा झाला. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्याने काही दिवसांपासून या कामाच्या भूमिपूजनाकडे लक्ष लागले आहे. विद्युतीकरणाच्या भूमिपूजनानिमित्त औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील सोयीसुविधांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. रेल्वेस्टेशनवर आवश्यक ती कामे करण्यात आली. भूमिपूजनाची कोनशिला कुठे बसवायची, याचीही चाचपणी करण्यात आली. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठविण्याचीही रेल्वेने तयार केली, पण फेब्रुवारीत कोरोनाचा विळखा वाढला आणि भूमिपूजनाचा मुहूर्त हुकत असल्याने विद्युतीकरण अजूनही कागदावरच आहे.,
भूमिपूजनाशिवाय काम सुरू करा
मराठवाड्यातील रेल्वेप्रश्न सुटण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. विद्युतीकरणाचे भूमिपूजन जानेवारीत होईल, मग नंतर फेब्रुवारीत होईल सांगितले. मार्च अर्धा संपला. तरीही भूमिपूजन झाले नाही. भूमिपूजन न करताही काम सुरू करता येईल.
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती
कोरोना वाढल्याने अडचण
भूमिपूजनासाठी रेल्वेमंत्री मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार होते. परंतु, कोरोना वाढल्याने अडचण येत आहे. त्यांच्या मी संपर्कात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते येतील. विद्युतीकरणासह अन्य कामे होण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना औरंगाबादला आणणे गरजेचे आहे. दिल्लीतून आनलाईन पद्धतीने भूमिपूजन अथवा भूमिपूजन न करताही काम सुरू करता येईल. यासंदर्भात रेल्वे बोर्डाशी चर्चा केली जाईल.- खा. डाॅ. भागवत कराड