छत्रपती संभाजीनगर : जि.प.च्या नवीन इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २०२१ पासून सुरू आहे. ३७ कोटींच्या तरतुदीसह सुरू झालेल्या त्या इमारतीचे बांधकाम ९० कोटींच्या आसपास का गेले ? यात नेमकी भानगड काय, असा सवाल पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी स्मार्ट कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित केला.
साडेतीन वर्षांत किती डीएसआर किती वाढला ? इमारतीचे मूळ अंदाजपत्रक, कंत्राटदाराला आजवर किती रक्कम दिली ? दीडपट इमारतीचे अंदाजपत्रक ५२ कोटींनी कसे वाढले, याचा अहवाल पालकमंत्र्यांनी मागविला आहे. दोन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार होते. मग साडेतीन वर्षांत का झाले नाही, यावरून पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेस खडसावले.
शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जि.प.च्या इमारतीसाठी १० कोटींचा निधी देण्याचे आश्वासित केले. परंतु, कितीदा त्या इमारतीला रक्कम द्यायची, असा सवालही केला होता. त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी सोमवारी बैठक घेत इमारतीच्या वाढीव अंदाजपत्रकात काय गौडबंगाल आहे, याची विचारणा केली.
इलेव्हेशन, सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते, अंडरग्राऊंड जलकुंभ, फर्निचर व इतर कामांना खर्च लागणार आहे. प्लास्टर, विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एन. के. कन्स्ट्रक्शन्स इमारतीचे काम करीत आहे. या प्रकरणाबाबत जि.प.चे सीईओ विकास मीना यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
घोळाचा संशय...जि. प.च्या इमारतीचे अंदाजपत्रक ३७ कोटींवर होते. त्यात सुधारणा करून ५२ कोटी रुपये वाढविले. ‘इव्हॅल्युशन’ म्हणजे नेमके काय केले ? ५२ कोटी का वाढविले, याचे उत्तर जि.प. प्रशासनाला देता आले नाही. सर्वानुमते इमारतीच्या कामात घोळ झाल्याची शंका आहे. मी सविस्तर माहिती मागविली आहे.- संजय शिरसाट, पालकमंत्री
इमारतीत काय आहे ?अध्यक्ष, उपाध्यक्ष, चार विषय समिती सभापती, प्रा. शिक्षण, आरोग्य विभाग, बांधकाम, समाज कल्याण, पेन्शन विभाग, स्टोअर रूम तळमजल्यावर असेल. पहिल्या मजला वित्त, सिंचन, ग्रामीण विकास यंत्रणा, सभागृह असेल. दुसऱ्या मजल्यावर सीईओ, अति. सीईओ, सामान्य प्रशासन, पंचायत विभाग, म. बा. विभाग, सभागृह असेल, तर तिसऱ्या मजल्यावर स्वच्छ मिशन भारत, पशुसंवर्धन, कृषी, सभागृह, ग्रंथालय व इतर विभाग असतील.