छत्रपती संभाजीनगर : किडनी खराब झाली, डायलिसिस सुरू झाले, असे म्हणण्याची वेळ अनेकांवर ओढवत आहे. शहरात आजघडीला दोन शासकीय रुग्णालयांत मोफत डायलिसिसची सुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, डायलिसिसची वेळच येणार नाही, यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी, असे तज्ज्ञांनी म्हटले.
अनेक कारणांनी किडनीचे आरोग्य धोक्यात येते. त्यातून डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणाची वेळ ओढवते. किडनी सुदृढ ठेवण्यासाठी शरीराची सर्वांगीण काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे, धूम्रपान टाळणे, जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, फास्ट फूड टाळणे महत्त्वाचे ठरते.
शहरात दोन शासकीय रुग्णालयांत सुविधाजिल्हा रुग्णालयात चार मशीन आहेत, तर घाटीतील सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये ६ मशीन आहेत.
डायलिसिस कोणाला लागते?जेव्हा दोन्ही किडन्या निकामी होतात, अशा परिस्थितीत किडनीच्या कामाच्या कृत्रिम पद्धतीला डायलिसिस म्हणतात. डायलिसिसद्वारे रक्तातील अनावश्यक उत्सर्जित पदार्थ-क्रिॲटिनीन, युरिया इ. दूर करून रक्त शुद्ध केले जाते.
खासगी रुग्णालयात खर्च किती?खासगी रुग्णालयात डायलिसिससाठी किमान ३ ते ४ हजार रुपये खर्च येतो. त्याशिवाय औषधींचा खर्च वेगळा करावा लागतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयात मोफतशासकीय रुग्णालयात डायलिसिस अगदी मोफत होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, घाटी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.
महिन्याला अडीचशे ते तीनशे जणांना लाभघाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात महिन्याला अडीचशे ते तीनशे जणांचे डायलिसिस होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज दोन ते तीन जणांचे डायलिसिस होते.
रोज दोन ते तीन रुग्णजिल्हा रुग्णालयामध्ये रोज दोन-तीन डायलिसिस होतात. एक मशीन इन्फेक्टेड पेशंटसाठी राखीव आहे. इतर तीन मशीनवर डायलिसिस चालू असते. मूत्ररोगतज्ज्ञ (नेफ्रॉलॉजिस्ट) कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली डायलिसिस केले जाते. जिल्हा रुग्णालयात सर्व तपासण्या व डायलिसिस अगदी मोफत केले जाते. तेव्हा गरजूंनी यांचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा.- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक
‘एसएसबी’मध्ये ६ मशीनसुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये ६ मशीन आहेत. ‘एसएसबी’ बिल्डिंग व्यतिरिक्त मेडिसिन इमारतीतही डायलिसिस होते. मे महिन्यात सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये २८९ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले.- डाॅ. सुधीर चौधरी, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल, घाटी