- विकास राऊत
औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण मार्गे शेवगाव ते तीसगावपासून पुढे अहमदनगर या एनएच क्रमांक २२२ च्या रुंदीकरणात मनपाची जलवाहिनी, नागरी वसाहतींमुळे अडचण असल्यामुळे संपूर्ण प्रकल्प अहवाल (डीपीआर) चे काम ठप्प पडले आहे. बिडकीन परिसरात २० ते २५ कि़मी.च्या अंतरात अडथळ्यांवर मात करीत या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी ३०० कोटींचा अतिरिक्त निधी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्या मार्गासाठी डीपीआर तयार केला होता; परंतु नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे या मार्गाच्या कामाची जबाबदारी देण्यात आल्याने तो डीपीआर रद्द करून नव्याने डीपीआर करण्याचे ठरले. औरंगाबाद ते पैठण ६० कि़मी. पैठण ते शेवगाव ३० कि़मी. पुढे २० कि़मी. तीसगावपर्यंत व तेथून पुढे ३० कि़मी. अहमदनगरपर्यंत या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. १४० कि़मी. पर्यंत या मार्गासाठी १ हजार १०० कोटींच्या आसपास खर्च लागण्याची शक्यता आहे; परंतु आजवर काहीही वेगवान हालचाली होताना दिसत नाहीत.
काही ठिकाणी जमिनीचे वाद आहेत. बिडकीनपर्यंत रुंदीकरणात अडचणी आहेत. बायपास करण्यासाठी कुठेही जागा नाही. काही मालमत्तांची तोडफोड करावी लागेल. मनपाची जलवाहिनीदेखील त्याच मार्गात आहे. जलवाहिनी काढून स्थलांतरित करण्याचा खर्च ३०० कोटींच्या आसपास जाईल, असे एनएचएआय सूत्रांनी सांगितले.
अजून निर्णय झालेला नाही२० ते २५ कि .मी.च्या अंतरात आर्थिकदृष्ट्या जो परवडेल तो पर्याय निवडून त्याची माहिती एनएचएआयच्या मुख्यालयाला कळवावी लागणार आहे. उड्डाणपूल, भूसंपादन करणे अथवा जलवाहिनी स्थलांतरणासाठी मनपाशी चर्चा करण्याचा निर्णय होईल. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासोबत मे आणि जुलै २०१८ मध्ये या रस्त्याबाबत बैठक झाली. सध्या डीपीआरचे काम ठप्प आहे. डीपीआरमध्ये जलवाहिनी व इतर अडचणी येत आहेत. भूसंपादन व इतर जलवाहिन्यांसह किती खर्च लागणार हे डीपीआरनंतर समोर येईल.
भारतमालामध्ये समावेश होऊन काहीच नाहीकेंद्रीय दळणवळण खात्याच्या भारतमाला योजनेंतर्गत औरंगाबाद ते पैठण मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कन्क्लेव्ह’ या कार्यक्रमात त्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) करण्याचे काम सुरू झाले. भूसंपादन, मार्ग रुंदीकरणात येणारी जलवाहिनी, निवासी घरकुलांची माहिती पुढे आल्यानंतर डीपीआरचे काम बंद पडले आहे. दरम्यान, एनएचएआयचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी या प्रकल्पाच्या सद्य:स्थितीबाबत सांगितले, चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. भारतमालामध्ये त्याचा समावेश आहे. अद्याप केंद्रीय दळणवळण खात्याकडून काहीही निर्देश आलेले नाहीत.
जुलै २०१८ पासून पाठपुरावाच नाही लिंक रोड ते पैठणपर्यंतच्या चौपदरीकरणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्यमान व भविष्यात होणाऱ्या जलवाहिनी योजनेची अडचण येणार आहे. २० ते २५ कि़मी. परिसरात जलवाहिनी चौपदरीकरणासाठी अडसर ठरणार असून, त्याबाबत तातडीने तोडगा निघाला, तर त्या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम मार्गी लागेल आणि रस्त्याच्या कामासाठी पुढील प्रक्रिया करणे सोपे होईल, असे मत नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी जुलै २०१८ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बैठकीत व्यक्त केले होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मनपाला रस्त्याचे चौपदरीकरण गृहीत धरून जलवाहिनी योजनेचा संभाव्य आराखडा तयार करण्याचे पत्र एनएचएआयला देण्याचे आदेश दिले होते; परंतु अजून मनपाने कोणताही पत्रव्यवहार याबाबत केलेला नाही.