औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील अपघात सत्रांमुळे महापालिकेची प्रचंड बदनामी होत आहे. या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी बुधवारी महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली. कनिष्ठ अधिकारी यावर उत्तर देण्यास असमर्थ ठरत असल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्तांनी बायपासचा मुद्दा अजेंड्यावर आहे. नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी अहवाल तयार करण्याचे काम करीत आहेत. लवकरच अंतिम निर्णय होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
नगरसेवक सिद्धांत शिरसाट, गजानन बारवाल, स्वाती नागरे, शिल्पाराणी वाडकर यांनी मुद्दाा उपस्थित केला. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सी. एम. अभंग यांनी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे नमूद केले. विधि सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले की, न्यायालयाने यापूर्वीच आदेश दिले आहेत की, रीतसर भूसंपादन करून रुंदीकरण करावे. उपअभियंता एस. एस. कुलकर्णी यांनी हा विषय उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्याकडे असल्याचे नमूद केले. अधिकाऱ्यांची ही टोलवाटोलवी लक्षात येताच आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी माईकचा ताबा घेतला.
न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका आहेत. अपघात सत्र रोखावे, अशी मागणी एका याचिकेत आहे. दुसऱ्या याचिकेत मालमत्ताधारकांना बजावण्यात आलेल्या नोटीसला आव्हान देण्यात आले. तत्कालीन आयुक्तांनी सुनावणी घेऊन निकाल दिला नाही. नंतर मी सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारीही यासंदर्भात एक बैठक घेणार आहेत, असे ते म्हणाले.
सायकलवर केली बायपासची पाहणीच्बायपासवरील अपघात पाहून अस्वस्थ झालेल्या मनपा आयुक्तांनी स्वत: या रस्त्याची सायकलवर जाऊन पाहणी केल्याचे आज बैठकीत नमूद केले. महानुभाव आश्रम ते देवळाई चौकापर्यंत अपघात का होत आहेत, याचे आपण सायकलवरून बारीक निरीक्षण केले.च्अनेक वाहनधारक राँग साईडने ये-जा करतात, त्यामुळे अपघात होत आहेत. नगररचना विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.