औरंगाबाद : ठेकेदार पतीला बुधवारी रात्री मारहाण केल्याच्या घटनेची तक्रार देण्यासाठी पत्नीसह दोन मुली सिडको पाेलीस ठाण्यात गेल्यानंतर घरी एकटा असलेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुुरुवारी सकाळी ८ वाजता घडली. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात दाखल केला.
संतोष गोविंद राठोड (३९, रा. गल्ली नंबर १४, आंबेडकर) असे आत्महत्या करणाऱ्या ठेकेदाराचे नाव आहे. संतोष यांच्या पत्नी अनिता यांनी सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम ठेकेदार असलेल्या पतीला बुधवारी सायंकाळी ९ वाजता परिसरातील धनंजय मिसाळ, गणेश मिसाळ व देविदास मिसाळ यांच्यासह तीन महिलांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. तसेच अनिता यांच्यासह त्यांच्या दोन मुलींनाही शिवीगाळ केली. या घटनेची तक्रार देण्यासाठी मायलेकी गुरुवारी सकाळी सिडको पोलीस ठाण्यात गेल्या. तेव्हा घरी एकटाच असलेल्या संतोष यांनी गळफास घेतला. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणात धनंजय मिसाळ, गणेश मिसाळ, देविदास मिसाळ यांच्यासह तीन महिलांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
चौकट,
अंत्यसंस्काराप्रसंगी गोंधळ
मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आंबेडकरनगर येथील स्मशानभूमीत आणल्यानंतर आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नातेवाइकांनी नकार दिला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर १०० पेक्षा अधिक नातेवाईक सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना तक्रारदारांनी हत्येचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. शांतता समितीच्या बैठकीसाठी गेलेले निरीक्षक संभाजी पवार ठाण्यात आल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.